Sakal, Tuesday, March 27, 2012
प्राथमिक
शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची स्थिती खराब नसली तरी अनेक बाबतीत
सुधारणेला वाव आहे. लाभार्थी व इतर घटकांशी संवाद साधूनच खरे चित्र कळते.
हा संवाद अधिक प्रभावी केला पाहिजे.
प्रथम रिसोर्स सेंटरचा "असर 2011' अहवाल प्रकाशित होताच महाराष्ट्रातही टीका करणारे लेख आणि बातम्या यायला सुरवात झाली. परंतु कोणत्याही त्रयस्थ अभ्यासापेक्षा लाभार्थी आणि इतर संबंधित शिक्षणव्यवस्थेबद्दल किती समाधानी आहेत आणि त्यांच्यात असलेल्या असमाधानाला व्यवस्थेकडून किती प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळतो, हाच त्या व्यवस्थेच्या कामगिरीचा खरा आधार असतो. केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून नजर टाकली तरी महाराष्ट्र सर्वच निकषांच्या बाबतीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा, तसेच कोणत्याही राज्याच्या कामगिरीपेक्षा पुढेच आहे. प्राथमिक स्तरातून माध्यमिक स्तरापर्यंत पोचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात 85 टक्के आहे. सर्वच स्तरांवर शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण खूपच चांगले आहे. एवढेच नाही, तर गुणवत्तेच्या बाबतीत त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालावेळीही नेहमीच दिसून येते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्राच्या वाट्याला दर वर्षी 1000 पैकी 200 पेक्षा जास्त शिष्यवृत्त्या येतात. इतर कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नसते. या आकडेवारीवरून वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील. एक मात्र निश्चित, की महाराष्ट्राची परिस्थिती निराशाजनक नाही; पण त्याच वेळी सुधारणा करायला भरपूर वाव आहे. आपल्यापुढे आव्हाने अनेक आहेत.
अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीत सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे. अनुदानित शाळांना थकबाकीसह वेतनेतर अनुदान देणे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संगणकांसह सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करणे, शिक्षक आणि अधिकारी यांची रिक्त पदे भरून त्यांची व्यावसायिक क्षमता आणि उत्तरदायित्व वाढविणे, या बाबींकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात जिल्हा परिषदा आणि महापालिका यांच्या शाळा, खासगी शाळा, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा, राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी या मंडळांच्या शाळा यांच्यामुळे पूर्वीपासून असलेली विषमता आणखीच वाढली आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ दर वर्षी प्रत्येक राज्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या आकडेवारीवर आणि शिक्षण हक्क कायद्यातील निकषांवर आधारित "शैक्षणिक विकास निर्देशांक' प्रकाशित करते. 2010-11 च्या निर्देशांकानुसार महाराष्ट्राचे स्थान 12 वे आहे. केरळ, तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या वर आहेत. महाराष्ट्राच्या वरच्या स्थानावर केंद्रशासित प्रदेश किंवा पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेली छोटी राज्ये आहेत. "असर 2011' आणि एनसीईआरटीचे सर्वेक्षण या दोन अहवालांपैकी एनसीईआरटीच्या अहवालानुसार पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, झारखंड, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश ही राज्ये महाराष्ट्राच्या वर आहेत. "असर 2011' अहवालानुसार, वाचनाच्या बाबतीत केरळ, हिमाचल प्रदेश आणि हरियाना ही तीन राज्ये, तर गणिताच्या बाबतीत केरळ, पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही पाच राज्ये पुढे असल्याचे दिसून येते. या अहवालांतील निष्कर्षांचा एकमेकांशी मुळीच ताळमेळ दिसून येत नाही. अशा निष्कर्षांचा ठोस स्वरूपाचे कार्यक्रम आणि धोरणे ठरविण्यासाठी उपयोग होऊ शकत नाही, हे मात्र नक्की.
राज्याचे क्रमांक ठरविणे फारसे उपयोगाचे नसते. त्रयस्थ मूल्यमापन मर्यादित प्रमाणातच उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक राज्याने याबद्दल सातत्याने लाभार्थी आणि इतर संबंधित यांच्याबरोबर संवेदनशीलतेने विचारमंथन सुरू ठेवून ठामपणे पुढे जात राहिले पाहिजे. इतर राज्यांत किंवा देशात काय चालले आहे, याची माहिती नक्कीच घ्यावी; पण त्यांची नक्कल आपल्याला उपयोगी पडणार नाही.
- डॉ. वसंत काळपांडे