सोमवार, १० जून, २०१३

माझ्या फेसबुक मित्रांच्या संख्येचा १०००चा टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ....


दिनांक १० जून २०१३ रोजी माझ्या फेसबुक मित्रांच्या संख्येने १०००चा टप्पा पूर्ण केला. दिनांक १ जून २००९ रोजी मी फेसबुक अकौंट उघडले होते.
 ३६ वर्षांच्या सेवेनंतर २००८मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मी काय करावे याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले. आतापर्यंत ज्या आवडणाऱ्या गोष्टी किंवा छंदांकडे दुर्लक्ष झाले ते आता पूर्ण करावे असा सल्ला देणारे बहुसंख्य होते. पण माझ्या असे लक्षात आले की माझ्याकडे शिक्षण हा एकुलता एक छंद शिल्लक राहिला असून माझे इतर सर्व छंद त्यातच सामावून गेले आहेत. शिक्षणाशिवाय मी काही करू शकत नाही आणि त्याशिवाय मी राहूही शकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या क्षेत्रातच कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता काम करायचे मी ठरवले आणि मी तेच करत आहे.
सेवानिवृत्तीनंतर माझ्या कामात दुसऱ्या कोणाची मदत होणार नसल्यामुळे संगणकाची मदत घेणे अपरिहार्य होते. इंटरनेटवर सर्फिंग, ई-मेल, वृत्तपत्रांकडे पाठवायचे लेख टाईप करणे असे करता करता एका परिचितांनी फेसबुकवर मला मित्र बनवले. काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फेसबुकवर मला दिसल्या. मी या शाळांना मित्र बनवायला सुरवात केली. अनेक शाळा आणि प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरांवरचे अनेक शिक्षक यांनी मलाही मित्र बनवून घेतले. काही शिक्षकांनी विशिष्ट शैक्षणिक उद्दिष्टे समोर ठेवून स्थापन केलेल्या फेसबुकवरील गटांमध्ये मलाही सहभागी करून घेतले. हे सर्व धडपडणारे उपक्रमशील शिक्षक आहेत. आज माझ्या १००० फेसबुक मित्रांपैकी सुमारे ९०० शिक्षक आहेत. आपले काम ज्यांच्यासाठी केवळ रोजीरोटीचे साधन नाही; तर ज्यात आपल्याला आनंद मिळतो, आपल्या जीवनाला ज्यामुळे दिशा मिळाली आहे असे ते लक्ष्यही आहे असे लोक फार कमी असतात. त्यांच्यापैकी हे शिक्षक आहेत. ज्या ठिकाणी वीज नाही, इंटरनेटची सोय नाही, अशा ठिकाणी फेसबुकवर शाळा आणि तेथील शिक्षक असावेत हे खरोखर मोठेच आश्चर्य आहे. या शिक्षकांचा उत्साह आणि प्रतिकूल परिस्थितीवर मत करण्याची जिद्द याला तोडच नाही. या शिक्षकांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे.
फेसबुक हे टाईमपास म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे माध्यम नसून ते विचारांच्या, माहितीच्या देवाण-घेवाणीचे अतिशय प्रभावी साधन आहे; peer directed e-learningचे ते प्रभावी साधन आहे. एका  ध्येयाने प्रेरित होऊन त्याचा वापर केला तर तर त्याची ताकद आणखीच वाढते हे मला या शिक्षकांच्या पोस्ट्सम वाचूनच कळले. शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, शिक्षकांच्या सेवाशर्तींबाबतचे प्रश्न, शिक्षणक्षेत्रातील वेगवेगळ्या घटनांवरचे भाष्य, आपल्या शाळेत नवीन काय सुरू आहे त्याची माहिती आणि त्याबाबत इतरांच्या प्रतिक्रिया, शिक्षणक्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांवर स्वत:ची मते आणि कल्पना सर्व सदस्यांनी मोकळेपणाने टाकल्याचे मला दिसून आले. माझ्या फेसबुक मित्रांचा मनाचा खुलेपणा, चांगल्याचे कौतुक आणि अडचणी असल्या तरी दुसऱ्या कोणाला दोष न देता त्यांतून मार्ग काढून तो  आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर शेअर करण्याचा मनाचा मोठेपणा मला खूपच भावला.
शिक्षणशास्त्राचे नियम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यांच्याप्रमाणे निसर्गदत्त नसतात. काही ध्येयाने प्रेरित झालेले, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल मनापासून जिव्हाळा असणारे शिक्षक सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन अडचणींतून मार्ग काढतात आणि स्वत:चे नवीन मार्ग शोधतात. त्यांनी शोधलेल्या या पाऊलवाटांवर आणखी काही शिक्षक चालतात. मग या पाऊलवाटांचे कच्च्या रस्त्यांत आणि नंतर राजमार्गात रुपांतर होते. त्या नंतर अशा पाऊलवाटांचा शिक्षणतज्ज्ञ शिक्षणशास्त्रात सिद्धांत म्हणून समावेश करतात. अशा पाऊलवाटा तयार करणाऱ्या तरुण शिक्षकांच्या संपर्कात मी आहे याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या हातून शिक्षणक्षेत्रात भरीव अशी कामगिरी घडो हेच वडीलकीच्या माझे नात्याने शुभाशीर्वाद.