"तुम्ही, आम्ही पालक" या मासिकाच्या सप्टेंबर २०१५च्या अंकात प्राकाशित झालेला लेख.
विद्यार्थिकेंद्रित शिक्षण, शिक्षक आणि पालक
डॉ. वसंत
काळपांडे
गुरु आपली वाट सुकर करतात
शिक्षकदिनाच्या आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला नेहमीच माझ्या आयुष्याला
वेगळी दिशा देणाऱ्या, कलाटणी देणाऱ्या शिक्षकांची आठवण येते. शाळा,
महाविद्यालयांमध्ये आपल्याला शिकवलेले शिक्षक अनेक असतात; पण ज्यांना गुरु म्हणता
येईल असे दुर्मिळच. खरे तर अशा शिक्षकांची आठवण यायला त्यांचे कधी विस्मरणच होत
नसते. “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते
कायम वाट दाखवत असतात.
आदर्श शिक्षक किंवा गुरु काय करतात? तर ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या
वाटा सुकर करतात. ते :-
·
विद्यार्थ्यांच्या विकासाच्या वाटा काही ना
काही कारणांनी अडलेल्या असतील तर त्या मोकळ्या करतात;
·
ज्यांच्या वाटा मोकळ्या झाल्या असतील
त्यांच्यामध्ये त्यावरून चालण्याची प्रेरणा आणि क्षमता निर्माण करतात; आणि
·
आपल्या समोरील आव्हाने सतत हसतमुखाने झेलत झेलत
विकासाच्या विकासाच्या नवनवीन वाटा धुंडाळत राहतात.
प्राथमिक शाळेतील माझे शिक्षक तायडेगुरुजी, भारंबेगुरुजी, माध्यमिक शाळेतील
डांगेबाई, वानखेडेसर, सरदेशमुखसर, दारव्हेकरसर आणि कानेडसर, महाविद्यालयातील डॉ.
करबेलसर या माझ्या गुरुंची शिक्षकदिनाच्या निमित्ताने मला प्रकर्षाने आठवण होते.
शाळेबाहेरही गुरु मिळतात. माझी आई ही माझी पहिली गुरु. तिच्यामुळेच माझे
शिक्षण पूर्ण होऊ शकले; जीवनाकडे पाहण्याचा रूढी परंपरा यांच्यापासून हटके दृष्टिकोन
निर्माण झाला आणि आशावादी आणि विजीगिषु वृत्ती निर्माण झाली. माझे भाग्य असे की महाराष्ट्र
शासनाच्या शिक्षण विभागात सेवा सुरू झाल्यानंतर मला मार्ग दाखवणारे माजी शिक्षण
संचालक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. वि. वि. चिपळूणकर हे मला गुरु म्हणून लाभले.
मी शिक्षण विभागात सेवेला सुरवात केल्यानंतर सरांनी मला नवी दृष्टी दिली; माझ्या
दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणला. १९७२मध्ये
मी एम. एससी. झालो. त्याचवर्षी माझी जिल्हा शिक्षणाधिकारी या पदासाठी निवड झाली.
एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर जुलै १९७३मध्ये माझी अहमदनगर जिल्ह्याचा
शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी चिपळूणकर सर एससीईआरटीचे संचालक होते.
प्रशिक्षणकाळात आणि त्यानंतरही प्रत्यक्ष भेटींच्या वेळी त्यांनी केलेले
मार्गदर्शन माझ्या दृष्टीने अनमोल आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक आणि
माध्यमिक शिक्षकांमध्ये सरांनी प्रचंड कार्यप्रेरणा आणि ऊर्जा निर्माण केली; त्यांनी
शिक्षकांच्या आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या
विकासाचे अनेक नवीन प्रयोग अमलात आणले. तो
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातला सुवर्णकाळच होता. १९८६मध्ये माजी पंतप्रधान
आणि त्यावेळचे मनुष्यबळ विकास मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी महाराष्ट्राचा
देशाची शैक्षणिक प्रयोगशाळा असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
सर शिक्षण संचालक या पदावरून १९८७मध्ये सेवानिवृत्त झाले. मूळचे मुंबईचे
असलेले, मुंबईमध्येच शिक्षण झालेले आणि सेवेची अनेक वर्षे मुंबई-पुण्यातच घालवलेले
सर सेवानिवृत्तीनंतर मात्र औरंगाबादला स्थायिक झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी
औरंगाबादला केलेल्या कार्याबद्दल त्यांचा १९९८मध्ये औरंगाबादच्या नागरिकांनी त्यांचा
भव्य नागरी सत्कार केला होता. आज त्यांचे वय ८६ वर्षे आहे.
सर आपले विचार अतिशय ओघवत्या, प्रासादिक, सोप्या भाषेत आणि सूत्रबद्ध
रीतीने मांडायचे. आपल्या कार्याला तात्त्विक भूमिकेचा आधार असलाच पाहिजे असा
चिपळूणकर सरांचा आग्रह असायचा. शिक्षणाच्या विविध क्षेत्रांबाबतच्या आपल्या
तात्त्विक भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडल्या. त्यांपैकीच एक पैलू –
विद्यार्थिकेद्री शिक्षण - उलगडून दाखवण्याचा या लेखात मी प्रयत्न केला आहे.
कोणत्याही विद्यार्थ्याचे ‘शिक्षक’ कोण आणि आणि ‘पालक’ कोण असा प्रश्न
विचारला तर या दोन वर्गांतील व्यक्तींची यादी करणे मुळीच कठीण काम नाही. परंतु या
दोघांच्याही भूमिकांची अनेकदा सरमिसळ झालेली दिसते आणि तशी ती होणे अपरिहार्यही
आहे. त्यामुळेच या लेखात शिक्षकांबद्दल जे म्हटले आहे, ते बऱ्याच प्रमाणात
पालकांनासुद्धा लागू होते आणि पालकांसाठीची विधाने बऱ्याच प्रमाणात शिक्षकांनाही
लागू पडतात.
विद्यार्थी हाच शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू
विद्यार्थिकेंद्री शिक्षण हा सरांच्या शैक्षणिक विचारसरणीचा गाभाच होता.
कोणताही निर्णय घेताना, कोणतेही धोरण ठरवताना त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित होते
काय? उत्तर “होय” असल्यास पुढे जा. “नाही” असल्यास विरोध करा. विद्यार्थ्यांचे हित
किंवा अहित दोन्ही नसेल तर तारतम्य बाळगून निर्णय घ्या.” असे त्यांचे म्हणणे असायचे.
शिक्षणक्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती कोणत्याही पदावर काम
करत असली तरी तिचा शिक्षणाचा अभ्यास असलाच पाहिजे. शिक्षकांपासून शिक्षण
संचालकांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने शिक्षणतज्ज्ञच असतो. शिक्षण क्षेत्रात
काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची दृष्टी विद्यार्थिकेंद्री असलीच पाहिजे असा
त्यांचा आग्रह असायचा.
चिपळूणकर सर म्हणायचे,
“विद्यार्थी किंवा बालक हेच शिक्षणातील ‘तत्’ याची जाणीव ठेवतो तो
शिक्षणतज्ज्ञ. शिक्षक केवळ शिक्षणतज्ज्ञ असून चालत भागत नाही. तो तन्मय, तत्पर,
तल्लीन, तदुपासक आणि तत्सेवकही असावा लागतो.”
‘सहज शिक्षण’ म्हणजेच
‘रचनावाद’
सध्या शालेय शिक्षणात रचनावादाचा बराच बोलबाला आहे. पण रचनावादाचा
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत कसा उपयोग करायचा याबद्दल अजूनही शिक्षकांमध्ये मोठ्या
प्रमाणावर संभ्रम आहे. चिपळूणकरसर त्यांचे विचार नेहमीच अतिशय सोप्या भाषेत
सूत्रबद्ध पद्धतीने मांडत. आज ज्या पद्धतीला रचनावादी शिक्षण पद्धती म्हणतात, तिला
ते ‘सहज शिक्षण’ म्हणायचे. सहज शिक्षणाचे मर्म सरांनी ४० वर्षांपूर्वी किती सोप्या
शब्दांत सांगितले होते ते पहा.
सहजशिक्षण
बालकांना :-
हसू द्या, खेळू द्या; हसत खेळत शिकू द्या
गाऊ द्या, नाचू द्या; गात नि नाचत शिकू द्या
ऐकू द्या, बोलू द्या; ऐकत बोलत
शिकू द्या
हिंडू द्या, बघू द्या; हिंडत बघत शिकू द्या
तोडू द्या, जोडू द्या; तोडत जोडत
शिकू द्या
आणि शिक्षक या नात्याने :-
झटकू नका, झिडकारू नका; दिशा दाखवा मदत करा
समरस व्हा, कौतुक करा; मनसोक्त
त्यांच्यावर प्रेम करा
हसत खेळत उड्या मारत; गाणी गुणगुणत
नाचत बागडत,
ऐकत बोलत हिंडत बघत; तोडत जोडत वाढू द्या उमलू द्या.
वाढता वाढता शिकू द्या, एकेक पैलू उकलू द्या
त्यांचं त्यांना वाढू द्या; त्यांचं त्यांना फुलू द्या
त्यांचं त्यांना उमलू द्या; त्यांचं त्यांना उजळू द्या
आपली स्वप्नं लादणं नको; त्यांच्या
स्वप्नांचा भंग नको
खलील जिब्रान
यांचे मुलांवरचे विचार
खलील जिब्रान (१८८३ – १९३१) हे लेबनॉनमध्ये
जन्मलेले, परंतु अमेरिकेत स्थायिक झालेले नामवंत तत्त्वज्ञ आणि कवी होते. ‘The
Profet’ या त्यांच्या कवितासंग्रहात ‘On Children’ या कवितेत मुलांकडे पालकांनी
कोणत्या दृष्टीकोनातून पहावे ते सांगितले आहे. अर्थात हे शिक्षकांनाही तेवढ्याच प्रमाणात
लागू पडते. या लेखात सहज शिक्षणाबद्दल जे विवेचन केले आहे त्यामागचीच तात्त्विक
भूमिका खलील जिब्रान यांच्या या कवितेत अतिशय सुंदर रीतीने आली आहे ते पहा.
मूळ इंग्रजी कविता आणि या कवितेचा मराठी
भावानुवाद पुढे दिला आहे:-
On children
Your children are
not your children.
They are the sons
and daughters of Life’s longing for itself.
They come through
you but not from you,
And though they
are with you, yet they belong not to you.
***
You may give them
your love but not your thoughts.
For they have
their own thoughts.
You may house
their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of
tomorrow, which
you cannot visit, not even in your dreams.
***
You may strive to
be like them, but seek not to make them like you.
For life goes not
backward nor tarries with yesterday.
***
You are the bows
from which your children are sent forth.
The archer sees
the mark upon the path of the infinite, and He bends you with His might that
his arrows may go swift and far.
Let your bending
in the archer’s hand be for gladness;
For even as He
loves the arrow that flies, so He loves also the bow that is stable.
------
मुले
मुलं तुमची
असूनही तुमची नसतात.
ती असतात जीवसृष्टीच्या
अभिलाषेची लेकरं.
तुम्ही त्यांना
जन्म दिला असला आणि ती तुमच्यासोबत असली तरीही ती नसतात
तुमची.
***
तुम्ही त्यांना
तुमचं प्रेम नक्की देऊ शकता, पण देऊ नका त्यांना तुमचे विचार;
कारण त्यांना
स्वत:चे विचार असतात.
तुम्ही ठेवू शकता त्यांना आपल्या घरट्यात; पण
तुम्ही धरून ठेवू शकणार नाहीत त्यांचे आत्मे.
कारण त्यांचे आत्मे राहत असतात भविष्याच्या
घरात;
तिथे तुम्ही नाही पोचू शकणार नाही; अगदी
स्वप्नातसुद्धा.
***
तुम्ही त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न नक्कीच
करा,
पण नका धडपडू त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा.
कारण जीवन भूतकाळात कधीच रेंगाळत नसते; ते
सदोदित पुढेच जात असते.
***
तुम्ही असता ईश्वराच्या हातातील धनुष्य ज्यामुळे
मुलं दूरवर निघून जातात.
तो धनुर्धारी अनंताच्या वाटेवरील लक्ष्य शोधून
तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी ताणून धरतो,
ज्यायोगे बाण वेगाने आणि दूरवर लक्ष्यापर्यंत
पोचू शकतील.
या धनुर्धाऱ्याच्या हातातील धनुष्य होऊन ताण
सोसणं किती आनंददायी असते!
कारण त्या धनुर्धाऱ्याला धनुष्यातून सुटलेला
बाण हवासा वाटतोच,
पण त्याला तेवढंच हवंसं वाटत असते स्थिर आणि बळकट असं धनुष्यदेखील.
अध्ययनाचे चार मार्ग
विद्यार्थ्यांच्या अध्ययनात शिक्षकाची भूमिका खूपच महत्त्वाची असते याबद्दल
दुमत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु शिक्षकाच्या वर्गाध्यापनातूनच विद्यार्थी
शिकतात असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थी (खरे म्हणजे सर्वचजण आयुष्यभर
विद्यार्थीच असल्यामुळे इतर कोणीही) कसे शिकतात याबद्दल महाभारताच्या उद्योगपर्वात
अतिशय सुरेख श्लोक आहे.
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया।
पादं सब्रह्मचारिभ्यः पादम्
कालक्रमेण च॥
संस्कृत
अन्वयार्थ
शिष्यः पादम् (ज्ञानम्) आचार्यात् आदत्ते (शिष्यः) पादम् (ज्ञानम्) स्वमेधया (च) (आदत्ते) ।
(शिष्यः) पादम्
(ज्ञानम्) सब्रह्मचारिभ्यः (च) (आदत्ते) (शिष्यः) पादम्
(ज्ञानम्) कालक्रमेण च (आदत्ते)॥
मराठी अनुवाद
विद्यार्थी एक चतुर्थांश (ज्ञान) शिक्षकांकडून मिळवतो, एक चतुर्थांश
स्वत:च्या बुद्धीने, एक चतुर्थांश सहाध्यायांकडून आणि एक चतुर्थांश अनुभवांतून
मिळवतो.
विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना शिक्षकांनी या चारही मार्गांचा योग्य
प्रमाणात उपयोग होईल हे पाहणे गरजेचे आहे. याच चार पद्धतींना आधुनिक परिभाषेत Expert-directed learning, Self-directed
learning, Peer-directed learning आणि Experiential
learning म्हणतात. केवळ शिक्षकाने शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या
सूचनांचे पालन करायचे अशा पद्धतीने शिकवले तर शिकण्याचे इतर मार्ग बंदच राहिल्यामुळे
आणि अध्ययन-निष्पत्ती खूपच सुमार दर्जाच्या राहतील. या चारही मार्गांचा योग्य प्रमाणात वापर
म्हणजेच रचनावादी पद्धतीने दिलेले शिक्षण; नाही का? शिक्षक आणि पालक या दोघांनीही
हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
शिक्षकांनी वारंवार स्वयंमूल्यमापन करायला हवे
विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्याप्रमाणे ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती या तीन
अंगांनी आपण मूल्यमापन करतो, त्याच पद्धतीने शिक्षकांनी स्वत:चे सुद्धा या तीन
अंगांनी मूल्यमापन वारंवार मूल्यमापन करायला हवे. या तीनही अंगांनी करायच्या
मूल्यमापनासाठी पुढे २५ मुद्दे दिले आहेत.
ज्ञान (आठ बाबी)
·
आपल्या विद्यार्थ्याबद्दल
·
आपल्या विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे
·
अभ्यासक्रमाचे
·
विविध अध्यापन तंत्रांचे
·
शैक्षणिक ध्येयधोरणाचे
·
शैक्षणिक साहित्य वापरण्याचे
·
मूल्यमापन तंत्राचे
·
घटक नियोजनाचे
कौशल्ये (आठ बाबी)
·
अध्यापन कौशल्य
·
मार्गदर्शन कौशल्य
·
भाषाविषयक मौखिक कौशल्य (वाचन, भाषण आणि
संभाषण)
·
क्रीडाकौशल्य
·
लेखनकौशल्य
·
हस्तोद्योग कौशल्य
·
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य
वृत्तिविकास (नऊ बाबी)
·
विद्यार्थ्यांबद्दल आंतरिक जिव्हाळा
·
शिकवण्याची आवड
·
अध्ययनशीलता
·
व्यवसायनिष्ठा
·
लोकशाही जीवनप्रणालीबद्दल श्रद्धा
·
घटनेतील मूल्यांबद्दल आदर आणि निष्ठा
·
अस्मिता
·
स्वयंसंशोधनाची वृत्ती
·
अंतर्बाह्य प्रसन्नता
अकबराने एकदा दरबारात प्रश्न विचारला होता, “२७मधून ९ गेले तर किती उरतात?”
बिरबल सोडून सर्वांनी उत्तर दिले, “१८”. बिरबलाने मात्र उत्तर दिले, “शून्य.”
अकबराने विचारल्यावर बिरबलाने खुलासा केला, “२७ नक्षत्रांपैकी पावसाची ९ नक्षत्रे
वजा केली तर काय उरणार? शून्यच!” तसेच २५ घटकांपैकी वृत्तिविकासाचे ९ घटक वजा झाले
तर अन्य १६ घटकांपैकी कशालाही अर्थ उरणार नाही.
हे मूल्यमापनाचे साधन त्या काळात सरांनी तयार केले होते. शिक्षक त्यात
स्वत:ला योग्य फेरबदल करून वापरू शकतील. हे स्वयंमूल्यमापन साधन म्हणजे शिक्षकाला
स्वत:ला पाहण्यासाठी एक आरसाच आहे. या आरशात स्वत:ला वारंवार तपासून पाहणे,
गरजेनुसार स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असलेल्या
व्यक्तींकडून, स्वत:चे स्वत:, आपल्या सहकाऱ्यांकडून आणि आपल्या अनुभवांतून शिकणे
या प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवाव्या लागतील. हे करत असताना जिज्ञासा,
चौकसबुद्धी, सर्जनशीलता या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या बाबींकडे स्वत:ला
आयुष्यभर विद्यार्थीच मानणारे आणि त्यानुसार कृती करणारे शिक्षक आणि पालक मुळीच
दुर्लक्ष होऊ देणार नाहीत हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
*************************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा