रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५


निवड बोर्डाची आणि शाळांची

डॉ. वसंत काळपांडे
आपल्या मुलांसाठी शाळेची निवड कशी करायची प्रश्न अतिशय किचकट झाला आहे. जी शाळा आपण आपल्या मुलांसाठी ठरवतो तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना  कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागते हे सर्वश्रुतच आहे. एकदा प्रवेश मिळाल्यानंतरही या हालअपेष्टा संपत  नाहीत. या विषयावरचा माझा हा लेख महाराष्ट्रातल्या शाळांपुरता आणि मराठी भाषिक पालकांसाठी आहे.
अगदी पूर्वीपासून शाळा निवडीचे निकष कसे बदलत गेले?
·         पूर्वीच्या काळात शाळेची निवड अगदी सोपी असायची. आपल्या मुलांना पालक जवळच्या शाळेत टाकायचे; निवडीचे इतर निकष लावायचा प्रश्न नसायचा.
·         सत्तरच्या दशकापासून शहरातील अनेक शाळांपैकी कोणती शाळा निवडायची यावर पालक विचार करायला लागले. या काळापर्यंतसुद्धा माध्यमाच्या निवडीचा प्रश्न नव्हता.
·         ऐंशीच्या दशकात तो शाळेच्या निवडीबरोबरच माध्यम कोणते; इंग्रजी की मराठी असाही झाला.
·         एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून या प्रश्नाचे स्वरूप आणखी गुंतागुंतीचे झाले. शाळा आणि माध्यम या दोन घटकांबरोबरच शाळा कोणत्या बोर्डाची, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, की आयबी, आयजीसीएसई किंवा अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची या तिसऱ्या घटकाची भर पडली.
         आजही आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळा अगदी मूठभरच आहेत;  परंतु सीबीएसई, आयसीएसई या बोर्डांच्या शाळांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. राज्य शासनाने मान्यता दिलेल्या एसएससी बोर्डाच्या काही शाळा हळुहळू आयसीएसई किंवा सीबीएसई या मंडळांकडे वळल्या आहेत किंवा वळायला लागल्या आहेत. त्यातच या दोन मंडळांच्या नव्याने सुरू झालेल्या शाळांची भर पडते आहे ती वेगळीच. अगदी तालुका पातळीपर्यंत सीबीएसई शाळांचे लोण पोचले आहे.
 ग्रामीण भागात मात्र आजही अनेक ठिकाणी प्राथमिक शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण तिथल्याच किंवा जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळेत असा सरधोपट मार्ग असतो.  मोठ्या शहरांमध्येही सीबीएसई किंवा आयसीएसईच्या शाळा असल्या तरी तिथेही बहुतेक पालक आपल्या मुलांना राज्य मंडळाच्या शाळांमध्येच पाठवतात.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ऐंशी-नव्वदच्या दशकापासून सुरू झालेला पालकांचा ओढा मात्र आजही टिकून आहे; किंबहुना तो वाढतच चालला आहे. मराठी माध्यमाच्या शाळा चालवणाऱ्या जवळजवळ सर्वच शैक्षणिक संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमाच्या हजारो शाळांना मान्यता दिली ते वेगळेच. याचाच परिणाम म्हणून ऐंशीच्या दशकाच्या शेवटी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाच टक्के हे प्रमाण तिपटीने वाढून आता १५ टक्के झाले आहे.
विविध शिक्षण मंडळे आणि इंग्रजी माध्यम असे पर्याय उपलब्ध असतील तर आजच्या पालकांना आपल्या मुलांच्या बाबतीत पुढील प्रश्न पडतात:-
·         मी माझ्या मुलाला (किंवा) मुलाला कोणत्या मंडळाच्या शाळेत टाकू? एसएससी बोर्डाच्या, सीबीएसईच्या की आयसीएसईच्या?
·         राज्य मंडळाच्या शाळेत टाकायचे असेल कोणत्या माध्यमात? मराठी की इंग्रजी?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी या तीनही मंडळांची पार्श्वभूमी पाहूया.
वीस हजारांपेक्षा जास्त माध्यमिक शाळा, दहावीला बसणारे १७ लाख विद्यार्थी, आठ भाषामाध्यमांतून शिक्षण देणारे, महाराष्ट्रात अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी मागणी असलेले एकमेव मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ. यालाच लोक एसएससी बोर्ड म्हणतात. दारिद्र्यरेषेखालच्या विद्यार्थ्यांपासून उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांपर्यंत, शहरी, ग्रामीण आदिवासी भागांतील विद्यार्थी अशा सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्याची जबाबदारी राज्य मंडळावर असते. 
सीबीएसई ही केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था असून प्रामुख्याने आपल्या राज्यांत प्रामुख्याने उच्च मध्यम वर्गातील मुले या बोर्डाच्या शाळांमध्ये शिकतात. केंद्रीय विद्यालयांमध्ये मात्र प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांची मुले शिकतात. महाराष्ट्रात या मंडळाच्या खासगी शाळांमध्ये शिक्षणाचे भाषामाध्यम इंग्रजी असते. केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पहिलीपासून सेमी-इंग्रजीची सोय असलेले हिंदी माध्यम असते. त्यालाच ते द्वैभाषिक माध्यम म्हणतात.
   आयसीएसईचा अभ्यासक्रम फार पूर्वी ‘इंटरस्टेट बोर्ड ऑफ अँग्लो-इंडियन एजुकेशन’मार्फत राबवला जायचा. इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेली पुस्तके लागू असायची. परीक्षासुद्धा केम्ब्रिजमधून घेतली जायची. प्रामुख्याने अँग्लो-इंडियन लोकांसाठी या शाळा सुरू झाल्या असल्या तरी पाश्चात्त्य संस्कृतीकडे ओढा असलेले काही मूठभर उच्चभ्रू समाजातले भारतीय पालकसुद्धा या शाळांमध्ये आपली मुले पाठवायचे. १९५८पासून या अभ्यासक्रमाचे भारतीयीकरण व्हायला सुरवात झाली. ‘इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ ही परीक्षा भारतातूनच आयोजित व्हायला लागली. या मंडळाने अँग्लो-इंडियन स्कूल्सशिवाय इतरही अनेक शाळांना मान्यता दिली. ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. प्रामुख्याने उच्चभ्रू समाजातले पालक या शाळांमध्ये आपली मुले पाठवायला लागले. या शाळा प्रामुख्याने मुंबईत एकवटल्या आहेत. राज्यात इतरत्र त्यांचे प्रमाण तुरळक आहे.
आजही या दोन्ही मंडळांच्या शाळांमधून पूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांच्या घरातच आहे.
वरवर या बदलाची कारणे शैक्षणिक वाटत असली तरी सामाजिक आणि आर्थिक घटकसुद्धा या बदलाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचे वारे शिक्षणक्षेत्रातही शिरले आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या बदलाने तेथे चांगलेच मूळ धरल्यानंतर शालेय शिक्षणातही हा बदल रुळायला नव्वदच्या दशकाच्या शेवटी सुरवात झाली. पालकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे चांगल्या राहणीमानाबरोबरच आपल्या मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करायला ते तयार असतात. मुलांच्या भवितव्याची काळजी तर त्यामागे दडलेली आहेच; पण त्याबरोबरच त्याला मिळणारे शिक्षण एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही मिरवता येते ते वेगळेच. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंग्रजी चांगले येणे आवश्यक असते; पण ते इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळेच येऊ शकेल ही आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोर्डांच्या शाळा राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा चांगल्याच असणार ही पालकांची मनोभूमिका तयार झाली आहे. अनेक संस्थाचालकांनी पालकांची ही मनोभूमिका ओळखून सीबीएसई किंवा आयसीएसई या अभ्यासक्रमांकडे वळायला सुरवात केली आहे. राज्यात ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा याच प्रवृत्तीतून सुरू झाल्या आहेत. या अभ्यासक्रमांसाठी फार भरमसाठ फी, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि इतर साहित्य, सहशालेय कार्यक्रम आणि इतर बाबी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करायला पालक खुशीने तयार असतात.
देशातील सर्वच माध्यमिक शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत असेच असतात. देशातील सर्व माध्यमिक शिक्षण मंडळे एकत्र येऊन कॉब्से (कौन्सिल ऑफ बोर्ड्स ऑफ सेकंडरी एजुकेशन) नावाची एक नोंदणीकृत संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेच्या सदस्यांच्या वेळोवेळी सभा, चर्चासत्रे, परिषदा आयोजित होतात. सदस्यांमध्ये माहितीची, विचारांची, कल्पनांची देवाणघेवाण होते. त्याआधारेच विविध माध्यमिक शिक्षण मंडळे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा-पद्धती यांबाबत आपले निर्णय घेतात. भाषा आणि सामाजिक शास्त्रे यांच्या अभ्यासक्रमात स्थानिक परिस्थितीनुरूप काहीसा बदल असतो; परंतु गणित आणि विज्ञान या विषयांचे अभ्यासक्रम जवळपास सारखे असतात. सीबीएसई किंवा आयसीएसई या दोन बोर्डांमध्ये विद्यार्थ्यांना एसएससीला केवळ दोनच भाषा शिकाव्या लागतात. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मात्र त्रिभाषा सूत्रानुसार तीन भाषा शिकाव्या लागतात. अर्थात भाषा हा भावनिक प्रश्न असल्यामुळे आणि त्यात सामाजिक आणि आर्थिक पैलूही गुंतलेले असल्यामुळे दोनच भाषा ठेवण्याचा निर्णय घेणे आपल्या राज्यात कितपत शक्य आहे हा प्रश्नच आहे. दुसरे म्हणजे बहुभाषिकत्व ही आजच्या काळात खूप उपयोगी ठरणारे कौशल्य आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एक भाषा जास्त शिकावी लागत असल्यामुळे त्यांच्या गुणांची टक्केवारी काही प्रमाणात कमी व्हायची. त्याचा परिणाम अकरावीच्या प्रवेशावर व्हायचा. आता मात्र “बेस्ट फाईव्ह’चा पर्याय आल्यामुळे मार्कांचा प्रश्न काहीसा सुटला आहे.
आयसीएसई किवा सीबीएसईच्या पुस्तकांच्या प्रचंड आकारामुळे या अभ्यासक्रमांबद्दल पालकांना प्रचंड आकर्षण असते आणि दराराही. शाळेची भरमसाठ फी भरून ही महागडी पुस्तके पालकांना विद्यार्थ्यांसाठी खरेदी करावी लागतात. खरे म्हणजे त्याची गरज आहे काय? ही माहिती विद्यार्थ्याला आयुष्यभर पुरणारी आहे काय? विद्यार्थीजीवनातही ती गरजेची असते काय? बदलाचा प्रचंड वेग आणि या बदलाची अनिश्चित दिशा हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. या बदलाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना स्वत:चे स्वत:च शिकता येणे महत्त्वाचे आहे. आज शाळेतल्या प्रत्यक्ष तासांशिवाय विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांमध्येही इंव्हॉल्व केले जाते. आयसीएसईच्या खासगी शिकवण्यांचे दर सर्वात जास्त आहेत. शाळा शिकवण्या, होमवर्क, छंदवर्ग, पालकांची ढोसणी अशा खूप साऱ्या अॅकटिव्हिटीजमुळे विद्यार्थ्यांना स्वत:ची स्पेस राहातच नाही. मुलाला स्वत:चे असे प्रश्न पडायला पाहिजेत; त्यांची उत्तरे स्वत:ची स्वत:च शोधता आली पाहिजे. स्वत:ला आवडणारे छंद जोपासता आले पाहिजेत, स्वत:च्या आवडीचे वाचता यायला पाहिजे; खेळायला मिळाले पाहिजे; स्वत: काही निर्मिती केल्याचा आनंद मिळाला पाहिजे. अन्यथा स्पूनफीडिंगची सवय लागेल.
आता एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच इंग्रजी, सेमी-इंग्रजी या सोयी उपलब्ध आहेतच. (सेमी-इंग्रजी (हिंदी माध्यमाच्या) असणाऱ्या सीबीएसईच्या ११०० केंद्रीय विद्यालयांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. त्यांचे विद्यार्थी सीबीएसईच्या खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस असतात असेच आजवरच्या सर्वेक्षणांतून दिसून आले आहे.) त्यामुळे मराठी माध्यमात शिकल्यामुळे आपल्या मुलाला चांगले इंग्रजी येणार नाही ही भीती बाळगण्याचे कारण नाही. शिवाय परदेशात चांगला जॉब मिळण्यासाठी तेथे इंग्रजीत व्यवहार करता येतील इतपतच चांगले इंग्रजी आवश्यक असते. खरी गरज असते ती तुमची तुमच्या विषयाचे ज्ञान आणि कौशले यांच्यावर घट्ट पकड असण्याची. ती नसेल तर तुमची किंमत शून्य असते. केवळ इंग्रजीमुळे व्यवसायात प्रगती होत असती तर अनेक मोठ्या कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरांपेक्षा त्यांच्या पी.ए. खूप सफाईदार इंग्रजी बोलतात असे जे दृश्य आज अनेक ठिकाणी दिसते ते दिसलेच नसते.
आजच्या पिढीतही बोर्डाच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकून ज्या व्यवसायांमध्ये इंग्रजी चांगले असणे आवश्यक असते अशी अनेक उदाहरणे आहेत. बाबा आमटे यांची आजची (तिसरी)पिढीसुद्धा मराठी माध्यमात शिकली आहे. रोल्फ नेवालीन्ना हा गणितातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले केवळ ३७ वर्षांचे डॉ. सुभाष खोत हे न्यूयॉर्क विद्यापीठात संगणक विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. एसएससीला कोल्हापूर विभागीय मंडळात प्रथम आलेलेले, गणित ऑलिम्पियाडचे रौप्य पदक विजेते आणि आयआयटी  प्रवेश परीक्षेत देशात प्रथम आलेले डॉ. सुभाष खोत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आहेत. याच वर्षी आयएएसमध्ये उज्ज्वल यश मिळवणारे रमेश घोलप जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत शिकले आहेत. या वर्षी महाराष्ट्रात आयएएसमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या अबोली नरवणे या पुण्याच्या विमलाबाई गरवारे या शाळेतून मराठी माध्यमात एसएससी झाल्या आहेत. शार्दूल कुलकर्णी हा विद्यार्थी दहावी आणि बारावी (विज्ञान) या दोन्ही परीक्षांमध्ये ९६ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाला. त्याने बारावीनंतर स्वत:च्या आवडीने पाच वर्षांच्या कायद्याचा अभ्यासक्रम निवडला. याच महिन्यात भूसंपादन विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी संसदेच्या समितीने त्याने लेखी स्वरूपात पाठवलेल्या सूचना वाचून साक्षीसाठी बोलावले. खासदारांच्या अशा समितीपुढे साक्ष देणारी संसदेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात लहान व्यक्ती (वय १८ वर्षे) म्हणून संसदेने त्याची गौरवाने नोंद केली. “एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकल्यामुळेच चौफेर वाचन करायला शार्दूलला पुरेसा मोकळा वेळ मिळाला. त्यामुळेच त्याला हे यश मिळू शकले.” असे त्याचे वडील आणि ‘लोकमत’, मुंबईचे संपादक चंद्रशेखर कुलकर्णी म्हणतात. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.    
विद्यार्थी कोणत्याही शाळेत शिकत असोत त्यांच्यासाठी काही टिप्स पुढे दिल्या आहेत.
शाळांमध्ये अध्यन-अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. अनेक शाळांमध्ये तर स्पूनफीडिंगच असते. पालकांचे मार्गदर्शन आणि त्यांचा दबाव वेगळाच. त्यात भर कोचिंग क्लासेसची. अनेक शाळांमध्ये केवळ गाईड्सचा वापर आणि प्रश्नोत्तरांचा सराव यांवरच भर असतो. या सर्वांमुळे मुलांची विचारशक्ती खुंटते. शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असतेच; परंतु त्याबरोबरच आपल्या सहाध्यायांबरोबर शिकणे, स्वत:चे स्वत: शिकणे या अंगांचाही उपयोग झाला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच इतर मंडळांची त्या त्या इयत्तांची (विशेषत: गणित आणि विज्ञान या विषयांची) पाठ्यपुस्तके वाचणे, त्यांत दिलेले प्रश्न, उदाहरणे सोडवणे विषय समजण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. शाळा विद्यार्थ्यांना घरी वाचायला पुस्तके दिली जातात त्याच पद्धतीने प्रयोगशाळेतील काही साहित्य घरी प्रयोग करून पाहण्यासाठी देता येईल.
ललित आणि ललितेतर साहित्याचे वाचनही महत्त्वाचे आहे. भाषेच्या पुस्तकात घेतलेला पाठ किंवा कविता ज्या मूळ पुस्तकातून घेतले असतील ती विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. त्या लेखकाची किंवा कवीची इतरही पुस्तके वाचली पाहिजेत. विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांना पूरक पुस्तके इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मराठी-मराठी, इंग्रजी-मराठी, इंग्रजी-इंग्रजी शब्दकोशांचा शाळेपासूनच वापर करायला प्रोत्साहन द्यायला हवे.
विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी सुधारण्यासाठी त्या त्या विषयांवरील इंग्रजी पुस्तकेसुद्धा वाचायला हवी. इंग्रजीत ललित आणि ललितेतर अशी साध्या सोप्या भाषेत लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. ती वाचायला प्रोत्साहन द्यावे. इंग्रजी वाहिन्यांवर मुलांनी पाहावेत असे अनेक कार्यक्रम आहेत. ते त्यांनी जरूर पाहावेत. 
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा कोणत्या बोर्डाची निवडावी; माध्यम कोणते निवडावे हे निर्णय अनेक पालक आपल्या परिचयाची मुले कोणत्या शाळेत शिकली, मुलांना कोणत्या शाळेत घातले म्हणजे आपल्याबद्दल आपल्या परिचितांना आपले कौतुक (किंवा हेवा) वाटेल अशा बाबींवरून ठरवतात. महाग ते चांगले, ज्याचे पॅकेजिंग चांगले तो माल चांगला या विश्वासाने केलेली ही निवड असते. केवळ इंग्रजी माध्यम, विद्यार्थ्यांच्या पैशानेच उपलब्ध केलेल्या भौतिक सुविधा, मार्केटिंग तंत्राचा उत्कृष्ट वापर, आणि या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सामाजिक आणि स्तर आणि त्यामुळे आलेला आत्मविश्वास यामुळे सीबीएसई आणि आयसीएसई या शाळांचा दर्जा अधिक चांगला असल्याचे जाणवत असले तरी या मंडळांच्या अनेक सुमार शाळासुद्धा अस्तित्वात आहेत. त्याचवेळी आजही अत्युत्कृष्ट दर्जा असलेल्या एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची केलेली आखणी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले उपक्रम यांमुळे परिस्थितीत जमीन-अस्मानाचे अंतर पडते.
सीबीएसई, आयसीएसई किंवा राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकताना पालक म्हणून आपण पुढील बाबींचा विचार करतो काय?
·         केवळ प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून तर आपण मुलांच्या शाळेची निवड करत नाही नं?
·         शाळेची फी आणि इतर खर्च आपल्याला परवडण्यासारखे आहेत काय? या खर्चांमुळे अनावश्यक ताण येऊन घरातले वातावरण कायम चिंताग्रस्त तर राहत नाही नं? (तसे असेल तर आपल्या मुलांच्यासुद्धा मानसिक स्थितीवर आणि पर्यायाने त्याच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होईल.)
·         मुलांसाठी पुस्तके, खेळणी, त्याच्या आवडीच्या इतर वस्तू  खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा शिल्लक राहतो काय?
·         शाळेकडून आपले आर्थिक शोषण होते अशी भावना आपल्या मनात असते काय?
·         शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून आपल्याला शाळेत मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आपण समाधानी असतो काय?
·         शाळेत वावरताना आपल्याला मोकळेपणा वाटतो काय? कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड तर वाटत नाही नं?
·         केवळ उच्चभू समाजातच वावरल्यामुळे आपल्या मुलांच्या/मुलींच्या मनात इतर समाजाबद्दल तुच्छतेची भावना तर निर्माण होत नाही नं?
·         आपली मुले शाळेत काय शिकली आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी व्यवस्थित कळते काय?
·         आपल्या मुलांना अभ्यासात काही अडचणी असतींल तर त्यांना आपण मदत करू शकतो काय?
·         आपल्या मुलांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी आत्मविश्वासाने संवाद साधू शकतो काय?
·         या शाळांमध्ये इंग्रजी आणि इतर विषयांत आपल्या मुलांची जी प्रगती होत आहे ती आपल्याला समाधानकारक वाटते काय?
·         आपला मुलगा (मुलगी) इंग्रजीतील ललित आणि ललितेतर साहित्य आवडीने वाचतो काय?
·         आपला मुलगा (मुलगी) इंग्रजीतून स्वयंस्फूर्तीने लिहितो काय?
·         आपली विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होतात काय?
·         आपला मुलगा (मुलगी) गणित ऑलिम्पियाड, होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि शाळेबाहेरील इतर विविध संस्थांनी आयोजित केलेल्या इतर स्पर्धांमध्ये सहभागी होतो काय? असल्यास त्याच्या संपादणुकीबाबत आपण सहभागी आहात काय?
·         मुलाची शोधक वृत्ती आणि सर्जनशीलता यांना शाळेत वाव मिळतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपली मुले शाळेत गेल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न केल्यास उशीर झाला असण्याची शक्यता आहे. इतर मुलांचे अनुभव काय आहेत ते डोळसपणे पहा. त्यांच्या पालकांच्या जागी स्वत:ला ठेवा. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी किंवा केजीमध्ये घातले असेल तर पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल याचा विचार करा. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच योग्य त्या शाळेची निवड करा..
*******


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा