गुरुवार, ७ जुलै, २०१६

­­
शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांच्यातील दरी कशी सांधायची?


शालेय शिक्षणाचा टप्पा बारावीपर्यंतचा मानला जात असला तरी अकरावी-बारावीचे वर्ग अनेक ठिकाणी महाविद्यालयांना जोडलेले असल्यामुळे महाविद्यालयीन जीवनाची सुरवात बहुतेकांच्या बाबतीत त्रिशंकू अवस्थेत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या टप्प्यापासूनच होते.  माध्यमिक शाळा -->कनिष्ठ महाविद्यालय-->महाविद्यालय-->व्यवसाय या सर्वच प्रवासात एक टप्पा ओलांडून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एकेक दरी असते. या दऱ्यांचे स्वरूप समजावून घेता आले, त्या पार करताना त्यांच्यावर पूल बांधता आले तर हा प्रवास सुसह्य आणि यशस्वी होऊ शकतो. शेवटच्या टप्प्यात काय हवे आहे हे लक्षात घेऊन शाळेपासूनच आमूलाग्र बदल करणे हा मात्र त्यावरचा मार्ग नाही. विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास आणि त्यांचे भावविश्व लक्षात घेऊनच त्या त्या स्तरावरचे अभ्यासक्रम आणि इतर कार्यक्रम आखावे लागतात आणि गरजेनुसार बदलावे लागतात.
इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिलीच सार्वजनिक परीक्षा. पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तिची नवलाई आणि काही प्रमाणात तणावही असणारच. परंतु हा तणाव कमीत कमी असावा या दृष्टीने देशातील बहुतेक परीक्षा मंडळांनी ही परीक्षा सोपी असावी या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच बहुतेक मंडळांचे दहावीच्या परीक्षेचे निकाल प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसते. पण विद्यार्थ्यांच्या मनावरचा तणाव काही कमी झाल्याचे दिसत नाही. अकरावीत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही, तर मंडळा-मंडळांमध्येही प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा निकोप नक्कीच नाही. शाळेच्या स्तरावर विद्यार्थी आणि पालक यांचे समुपदेशन तर परीक्षा मंडळांच्या स्तरावर विचारविनिमयातून उपाययोजना आखणे या दृष्टीने पावले उचलावी लागतील.
बहुतेक सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर पोशाख, वक्तशीरपणा, ऑफ पिरियडला पर्यायी व्यवस्था, मोबाईल फोनचा वापर, इंटरनेटचा वापर अशा अनेक बाबतीत कमी-अधिक बंधने असतात. महाविद्यालयांत मात्र ती खूपच सैल झालेली असतात. पालक आणि शिक्षक यांचा विद्यार्थ्यांवरचा प्रभावही खूप प्रमाणात कमी झालेला असतो. या मोकळ्या वातावरणाचे मुलांना अप्रूप वाटणारच. मात्र त्याचवेळी व्यसने, भिन्नलिंगी आकर्षण, चंगळवाद, वाईट संगत अशा वाईट गोष्टींच्या आहारी गेल्याची आणि त्यांतून गुन्हे घडल्याची उदाहरणेही काही कमी नाहीत.  याचा विपरीत परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. हे सर्व टाळण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्या वेळोवेळी सभा घेऊन त्यांच्या समुपदेशनाची तरतूद करता येईल काय? महाविद्यालयीन शिक्षकांना mentor म्हणून भूमिका पार पाडता येईल काय? महाविद्यालयांमध्ये ऑफ पिरियड चांगल्या रीतीने कसे वापरता येतील? या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अनेक शाळांमध्ये तर स्पून फीडिंगच चालते. पालकांचे मार्गदर्शन आणि त्यांचा दबाव वेगळाच. त्यात भर पडते ती कोचिंग क्लासेसची. अनेक शाळांमध्ये केवळ गाईड्सचे वाचन आणि प्रश्नोत्तरांचा सराव यांवरच भर दिला जातो. हे सर्व करताना विद्यार्थ्यांना स्वत:चा एक अवकाश-space- देण्याची गरज असते तो त्यांना मिळत नाही. या सर्वांमुळे मुलांची विचारशक्ती, सर्जनशीलता खुंटते. दुसरे टोक महाविद्यालयांमध्ये दिसते. तिथे काही सन्माननीय अपवाद वगळता शिक्षक त्या त्या तासाला आपला विषय शिकवून झाला की आपले कर्तव्य संपले असे मानतात. विद्यार्थ्यांना समजले की नाही याच्याशी त्यांना काहीही घेणे-देणे नसते. सध्याच्या परिस्थितीत परीक्षांमध्ये यश मिळावे, स्पर्धेत टिकून राहावे यासाठी तयारी तर करावीच लागेल, परंतु त्याबरोबरच शिक्षकांकडून शिकणे, सहाध्यायांबरोबर शिकणे आणि स्वत:चे स्वत: शिकणे या  अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या तिन्ही अंगांचा शिक्षणाच्या सर्व स्तरांवर योग्य प्रमाणात उपयोग केला पाहिजे.
शाळेच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच इतर मंडळांचीही त्या त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके वापरणे विद्यार्थ्यांना ते ते विषय आणखी चांगले समजायला, संबोध पक्के व्हायला मदत होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी आपल्या आणि इतर मंडळांची पाठ्यपुस्तके वाचूनच थांबू नये, तर त्यांत दिलेले प्रश्न, उदाहरणेसुद्धा सोडवावी. पाठ्यपुस्तकांमध्ये प्रयोग, सर्वेक्षणे, निरीक्षणे, मुलाखती, जाहिराती तयार करणे, प्रकल्प आणि इतर अनेक कृती दिलेल्या असतात. त्या शाळांमध्ये करवून घेतल्या जावोत किंवा नाही, पण विद्यार्थ्यांनी मात्र त्या अवश्य कराव्यात. त्यात त्यांचा फायदाच आहे. शाळेत विद्यार्थ्यांना घरी वाचण्यासाठी पुस्तके दिली जातात. त्याच पद्धतीने प्रयोगशाळेतील काही साहित्य विद्यार्थ्यांना घरी वापरण्यासाठी देता येईल काय?
ललित आणि ललितेतर साहित्याचे वाचनही महत्त्वाचे आहे. भाषेच्या पुस्तकात घेतलेला पाठ ज्या पुस्तकातून घेतला आहे ते पुस्तक, त्या लेखकाची इतर पुस्तके, त्याच विषयावरील इतर पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, अशा अनेक विषयाशी संबधित पूरक पुस्तके मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मराठी-मराठी, इंग्रजी-मराठी आणि इंग्रजी-इंग्रजी शब्दकोशांचा वापर करायला शाळेपासूनच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. या वाचनामुळे विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट व्हायला, विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढायला, त्यांची दृष्टी विस्तारायला आणि संदर्भ कसे शोधायचे ते शिकायला मदत होते.
मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात इंग्रजी माध्यमात शिकताना काहीच समजत नसल्यामुळे कोणत्या अडचणी येतात आणि त्यामुळे अनेकांचे कसे नुकसान होते हे सर्वश्रुतच आहे. शाळेपासूनच विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी पाठ्यपुस्तकांबरोबरच त्या त्या विषयांची आपल्या आणि इतर मंडळांची इंग्रजी पाठ्यपुस्तकेही वाचावीत. इंग्रजी वाहिन्यांवर मुलांनी पाहावेत असे अनेक कार्यक्रम उपलब्ध आहेत. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात आणि कृतिपुस्तिकेत दिलेल्या सर्व कृती मनापासून करा आणि काय फरक पडतो ते अनुभवा.  ‘सकाळ’ने २०१२मध्ये प्रकाशित केलेल्या ‘फास्ट ट्रॅक’ आणि ‘फुल टू स्मार्ट’ या दोन सदरांत धनवंती हर्डीकर यांचे इंग्रजी वाचन आणि इतर कौशल्ये यांवर दिलेले लेख विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी अवश्य वाचावे.
सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या करीअरची निवड. आपली आवड, आपल्या क्षमता लक्षात घेऊनच ती करावी. पालकांनी विद्यार्थ्यांवर त्यासाठी दबाव टाकू नये आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या सहाध्यायांमागे आंधळ्यासारखे धावू नये. शालेय जीवनापासून व्यवसायात पदार्पण करेपर्यंत आपल्याला साथ देतात ती जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली दहा जीवन कौशल्ये. ती आहेत: ‘स्व’ची जाणीव, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, परिणामकारक संवाद कौशल्य, व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबंध, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, भावनांचे समायोजन आणि ताणतणावांचे समायोजन. आज उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमतेचे प्रमाण जेमतेम २५ टक्के आहे. इंग्रजीवरील प्रभुत्व, जीवन कौशल्ये आणि स्व-शिक्षणाची क्षमता यांच्या अभावामुळेच हे घडते आहे. शालेय शिक्षणापासूनच त्यांकडे लक्ष दिले गेल्यास परिस्थिती नक्कीच बदलेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा