सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

शिक्षणव्रती : डॉ. कुमुद बन्सल




महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षणक्षेत्राला बन्सलमॅडमचे नेतृत्व प्रदीर्घ कालावधीसाठी लाभले होते. त्यांच्यासोबत अकरा वर्षे काम काम करण्याची संधी मला मिळाली. आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींचा उत्साह वाढवणे, आपण जे काम करतो त्यामागचा हेतू ओळखून उदात्त ध्येयासाठी आपण काम करत आहोत अशी अशी भावना त्यांच्यात निर्माण करणे, त्यांच्यातील गुण आणि मर्यादा ओळखून त्यांच्याकडे कामे सोपवणे, वेळोवेळी योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घेणे, काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवणे, एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय त्या व्यक्तीला समक्ष आणि तिच्या माघारीही देणे, परंतु स्वत: मात्र कोणत्याही श्रेयापासून किंवा मानमरातबापासून दूर राहणे, स्वत:सुद्धा झोकून देऊन त्या कामात उतरणे,  हे उच्च दर्जाच्या नेतृत्वाला  आवश्यक असणारे, परंतु क्वचितच आढळणारे गुण बन्सलमॅडममध्ये होते. एखादा अधिकारी एखादे काम चांगल्या प्रकारे करू शकेल असे त्यांना वाटले तर तो विषय त्याच्याकडे नसला तरी त्यालाच ते काम करायला सांगायच्या. मी स्वत: असे अनेक अनुभव घेतले आहेत. त्यांच्याबद्दलच्या माझ्या काही वैयक्तिक आठवणी.
***
१९८२ ते १९८५ या कालावधीत मी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विश्वविद्यालयात प्रतिनियुक्तीवर काम करत होतो. बन्सलमॅडमसुद्धा त्या कालावधीतच केंद्र शासनात प्रतिनियुक्तीवर होत्या. त्या प्रौढ शिक्षण हा विषय हा विषय हाताळत होत्या. या कालावधीत काही भेटी झाल्या, पण त्या ओझरत्याच. १९८६ मध्ये मी महाराष्ट्रात परत आलो. मंत्रालयात शिक्षण विभागात उपसचिव म्हणून माझी नेमणूक झाली. १९८६च्या फेब्रुवारीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाने पुण्याला एक परिषद आयोजित केली होती. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री नरसिंहराव हे परिषदेला उपस्थित होते. परिषदेच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे होती. केंद्र शासनाचे काही अधिकारी आले होते. बन्सलमॅडमसुद्धा आल्या होत्या. त्यांनी मध्येच मला एक वैयक्तिक काम सांगितले. त्यांना एक नुकतेच प्रकाशित झालेले मराठी पुस्तक पाहिजे होते. दिल्लीला जाऊनही त्यांनी मराठी वाचन सोडले नव्हते.
१९८७च्या जुलैमध्ये मॅडम महाराष्ट्रात पदोन्नतीवर सचिव म्हणून परत आल्या. शासनाने त्यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षणाची जबाबदारी सोपवली होती. पण त्यांना खरी आवड होती ती शालेय शिक्षण आणि साक्षरता कार्यक्रम यांची. पण त्या काळात शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी सेवेने ज्येष्ठ सचिवांकडे असायची. तडजोड म्हणून त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे त्यावेळचे सचिव श्री. कोल्हटकर यांना विनंती करून प्रौढ शिक्षण हा विषय स्वत:कडे मागून घेतला. या अत्यंत दुर्लक्षित विषयात त्यांनी लक्ष घालताच चैतन्य निर्माण झाले. त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सॅम पित्रोदा यांच्या नेतत्वाखाली जी पाच टेक्नॉलॉजी मिशन्स सुरू केली होती त्यात साक्षरता मिशनचा समावेश होता. २ जून १९८८ रोजी महाराष्ट्रात साक्षरता मिशनच्या शुभारंभाचा त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते दिमाखदार सोहळा झाला. मॅडमचा मधला चार-पाच वर्षांचा कालावधी दिल्लीतच गेला असल्यामुळे  त्यांचा मराठीत बोलण्याचा सराव तुटला होता. तरीही भाषण मराठीतच करायचे अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. भाषण वाचून दाखवण्याची त्यांची इच्छा नव्हती. पण खूप प्रयत्न करूनही ऐनवेळी  हे जमणार नाही असे जेव्हा त्यांना वाटले त्यावेळी एक अभिनव कल्पना त्यांना सुचली. बालचित्रवाणीच्या मदतीने त्यांनी त्यांच्या भाषणावर आधारलेली एक चित्रफित तयार करून घेऊन त्यात स्वत:चे टेप केलेले भाषण डब केले. त्यांनी मराठीत केलेल्या सुंदर भाषणाबद्दल सगळ्यांकडून वाहवा मिळाली. त्यांनासुद्धा त्या लोकभावनेचा आदर करू शकल्या याबद्दल खूपच समाधान वाटले.
मॅडम, हा प्रयोग तर खूपच चांगला झाला. पण तो नेहमी करता येणं शक्य नाही.” मी त्यांना म्हणालो. “खरं आहे तुम्ही म्हणता ते. काही तरी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत.” त्या म्हणाल्या. मग त्यांनी दोन गोष्टी कटाक्षाने केल्या. एक म्हणजे महाराष्ट्रातून त्यांना भेटायला आलेली व्यक्ती इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलली तरी त्या मराठीतच बोलायच्या; वेगवेगळ्या सभांमध्येही मराठीतच बोलायच्या. दुसरे म्हणजे त्यांनी मराठीत अनेक पुस्तके वाचून काढली. त्यांनी ‘ययाती’ आणि ‘मृत्यंजय’ या कादंबऱ्या हिंदीत वाचल्या होत्या. या दोन्ही मूळ मराठी कादंबऱ्याही त्यांनी नंतर वाचल्या. स्वामी, श्रीमान योगी, राधेय, रघुनाथाची बखर, आनंदी गोपाळ या कादंबऱ्याही त्यांनी वाचल्या. ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्य वाचायला त्यांना खूप आवडायचे. पण एकदा मी त्यांना विजय तेंडुलकरांचे ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक वाचायला दिले होते. तेसुद्धा त्यांनी तेवढ्याच आवडीने वाचले.
एकदा उत्तर प्रदेश सरकारचे एक शिक्षण सचिव मुंबईला स्वत:च्या खासगी कामासाठी आले होते. ते सहज म्हणून मॅडमना भेटायला आले. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेविषयी चर्चा करताना मॅडमनी मला बोलावून घेतले होते. मध्येच मंत्रालयाचे काही अधिकारी फाईल्स घेऊन आले, त्यांच्याशी त्या मराठीतच बोलल्या. आलेल्या फोननाही मराठीतच उत्तरे दिली. उत्तर प्रदेशचे शिक्षण सचिव म्हणाले, “आप इतनी अच्छी मराठी कैसे बोलती हैं?मॅडमनी फक्त स्मित केले. “ऐसेही चलता रहेगा तो आप हिंदी और अंगरेजी भूल जाएंगी.” ते गमतीने म्हणाले. मॅडम हसल्या. म्हणाल्या, “We must blend ourselves with the language and the culture of the people with whom we live and work.”
१९९१मध्ये महाराष्ट्र शासनाने शिक्षण, प्रशासन आणि लोकव्यवहार यांमध्ये मराठीचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल उपाययोजना सुचवणे आणि राज्यस्तरावर एका संस्थेची स्थापना करणे यासाठी प्रा. वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. बन्सलमॅडम या समितीच्या सदस्य-सचिव होत्या. हा विषय दुसऱ्या एका उपसचिवांकडे होता. पण मॅडमनी हे काम माझ्याकडे सोपवले. डॉ. अशोक केळकर, डॉ. यू. म. पठाण, मधु मंगेश कर्णिक, मु. श्री. कानडे, के. ज. पुरोहित(शांताराम), डॉ. सरोजिनी वैद्य आणि इतर अनेक मान्यवर आणि नामवंत साहित्यिक या समितीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट, डॉ. अशोक केळकर आणि डॉ. सरोजिनी वैद्य यांचा या कामात विशेष पुढाकार असायचा. बैठकीच्या आधी आणि नंतरही ते थांबून काम करायचे. या चर्चा माझ्या खोलीतच होत असत. या तिघांशीही त्यामुळे माझी खूपच चांगली ओळख झाली. मराठीचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या उभारणीत माझाही खारीचा वाट आहे याचे एक समाधान होते. बैठकीत झालेल्या चर्चांची टिपणे तयार करणे, राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्याची रूपरेषा ठरवणे, तिची घटना आणि नियमावली तयार करणे, अंदाजपत्रक तयार करून आर्थिक तरतूद करणे, मंत्रिमंडळाची मान्यता घेणे या बाबी मॅडमच्या पुढाकारामुळे खूपच वेगाने झाल्या. हे सर्व झाल्यानंतर मला मंत्रालयातल्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली ते विचारून घेतले. त्यांना स्वत:च्या सहीने त्यांचे कौतुक करणारी पत्रे दिली. राज्य मराठी विकास संस्थेचे उद्घाटन १ मे १९९२ रोजी ठरले. त्याच्या चार-पाच दिवस अगोदर काय काय तयारी झाली याची माहिती द्यायला त्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे गेल्या. जाताना त्या मलापण त्यांच्या बरोबर घेऊन गेल्या.  त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. १९९२च्या महाराष्ट्र दिनी राज्य मराठी विकास संस्थेचा जन्म झाला.
१९९२मध्ये माझी बदली पुण्याला बालचित्रवाणीचा संचालक म्हणून झाली. १९९३मध्ये एकदा मी एकदा मंत्रालयात गेलो असताना त्यांनी माझ्याकडे एक मोठी टिपणी वाचायला दिली. “कशी वाटते?” त्यांनी विचारले. “चांगली झाली.” मी म्हणालो. “भाषा ठीक आहे?” त्यांनी परत विचारले. मी म्हटले, “हो. चांगलीच आहे. कोणी तयार केली?” “मीच.” त्या म्हणाल्या. “शुद्धलेखन किंवा व्याकरणाचीसुद्धा यात चूक नाही.” मी म्हणालो. “Credit for that goes to my stenographer, and not to me. तिने टाईप करताना या चुका केल्या नाहीत.”  
***
१९९०मध्ये त्यांच्या आवडीचा शालेय शिक्षण हा विषय त्यांच्याकडे आला. १९९१मध्ये मी मंत्रालयात उपसचिव म्हणून काम करत असताना सर्वच शाळांना सारख्या प्रमाणात वेतनेतर अनुदान देण्याऐवजी लहान शाळा, नवीन शाळा, ग्रामीण आणि दुर्गम भागात असणाऱ्या शाळा, मुली आणि मागासवर्गीय यांचे जास्त प्रमाण असलेल्या शाळा यांना जास्त अनुदान मिळायला पाहिजे अशी कल्पना त्यावेळचे शिक्षण मंत्री श्री. अनंतराव थोपटे यांनी एकदा अनौपचारिक चर्चेत मांडली. मी म्हटले, “कल्पना चांगली आहे. पण सर्वांना मान्य होईल आणि अगदी लिपिकसुद्धा वापरू शकेल अशी सोपी कार्यपद्धती निश्चित करावी लागेल. नाहीतर ही कल्पना भाषणापुरतीच मर्यादित राहील.” “तुम्हीच का करत नाही हे?” थोपटेसाहेब मला म्हणाले. “मी?” मी पुढे काही बोलणार त्यापूर्वीच मॅडम म्हणाल्या, “हो, सर. ते नक्कीच करतील.” नंतर मॅडमच्या खोलीत जाऊन त्यांना म्हटले, “मॅडम, हा विषय माझ्याकडे नाही.” “नसू द्या. तुम्हीच हे करू शकाल.” त्या म्हणाल्या. नाशिक जिल्ह्याच्या शाळांचे विश्लेषण करून नंतर विकसनशीलतेच्या निर्देशांकाची संकल्पना आणि त्यावर आधारलेले वेतनेतर अनुदानाचे सूत्र त्या झाले आणि त्याला शासनाची मान्यता मिळून ते लागूही झाले.
१९९२मध्ये त्यावेळचे शालेय शिक्षण मंत्री श्री. सलीम झकेरिया यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण  आणि साक्षरता कार्यक्रम यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालाचा मसुदा लिहिण्यासाठी लेखन समितीचा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. केंद्र प्रमुखांच्या पदांची निर्मिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शिक्षकांच्या वेतनाच्या ४% वेतनेतर अनुदान यांचे प्रस्ताव आणि शासन निर्णय यांचे मसुदे तयार करण्याची जबाबदारीसुद्धा माझ्याकडेच सोपवली होती. ग्राम शिक्षण समित्या त्यांच्या पुढाकारामुळे यापूर्वीच सुरु झाल्या होत्या. विकेंद्रीकरणावर असलेला मनापासूनचा त्यांचा विश्वास आणि आग्रह यातूनच अमलात आलेल्या या योजनांचे केंद्र शासनालाही अनुकरण करावे लागले.
***
जानेवारीच्या १९९५ पहिल्या आठवड्यात इगतपुरी येथील हॉटेल मानसमध्ये युनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी विजयाताई चौहान यांच्या पुढाकाराने राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचा एक प्रशिक्षण वर्ग आयोजित झाला होता. या कार्यक्रमात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या वरच्या दर्जाचे अधिकारी, तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. मी त्यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा संचालक म्हणून काम पाहत होतो. बन्सलमॅडम शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव होत्या. त्यासुद्धा आमच्याबरोबरच प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षक होते व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास पंडित आणि जयश्री पटवर्धन. रोल प्ले, सिम्युलेशन, वेगवेगळ्या चाचण्या, एक्झरसाईझेस, खेळ, गटचर्चा अशा विविध तंत्रांचा अवलंब केल्यामुळे प्रशिक्षण सर्वांनाच खूप आवडले होते. अभिनव पद्धतीने एकमेकांची ओळख करून घेतल्यानंतर जयश्री पटवर्धन यांनी “जर तुमचं पूर्वीचं आयुष्य पुसून टाकून नव्यानं आयुष्य जगण्याची संधी मिळाली - तुम्हाला ‘सेकंड चान्स’ मिळाला - तर तुम्ही कोणता व्यवसाय निवडाल?’ असा प्रश्न विचारला. प्रत्येकाने आपापली उत्तरे दिली. सर्वांची उत्तरे देऊन झाल्यानंतर त्या म्हणाल्या, “दोन अपवाद सोडले तर इथे आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या व्यवसायात बदल हवा आहे. कोणाला लेखक व्हायचं आहे, तर कोणाला चित्रकार; कोणाला स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कोणाला सामाजिक कार्य करायचं आहे. काहींना त्यांच्या मूळ पदवीचा उपयोग करून डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचं आहे. आहे त्या व्यवसायातच शिक्षणाचं कार्य पुढे चालू ठेवावं असं केवळ बन्सलमॅडमनाच वाटते. दुसरा अपवाद आहे तो डॉ. काळपांडे यांचा.” आपल्या कामात कितपत समाधान मिळते ते पाहण्यासाठी हा एक्झरसाईझ होता.
त्यानंतर सर्जनशीलतेची चाचणी होती. ही एक पेपर-पेन्सिल टेस्ट होती. चाचणीसाठी दहा मिनिटांचा वेळ होता. दहा मिनिटांनंतर जयश्री पटवर्धन यांनी आमचे कागद परत घेतले. मी जिथे बसलो होतो तिथे मॅडम आल्या. म्हणाल्या, “तुम्हाला जमलं काय?” “नाही.” मी म्हणालो. “Thank God! Now I am feeling so relieved! मला पण  जमलं नाही.” त्या म्हणाल्या. मला खूप गंमत वाटली आणि हसू आले. “मॅडम, घीसा-पिटा मार्ग निवडणाऱ्यांमध्ये क्रिएटीव्हीटी कशी असेल?” मी म्हणालो. त्यापण हसल्या.Anyway, it was an interesting exercise.” असे म्हणून परत आपल्या जागेवर परत गेल्या.
***
१९९८मध्ये बन्सलमॅडमची शालेय शिक्षण विभागातून बदली झाली. पण त्यानंतरही त्यांची प्रत्यक्ष किंवा फोनवर मधूनमधून भेट व्हायची.
मार्च २००५मध्ये महाराष्ट्रात पाठ्यपुस्तके लवकर मिळणार नाहीत असे स्पष्ट चित्र दिसायला लागले होते. मार्चपर्यंत ८०% छपाई व्हायला पाहिजे होती; प्रत्यक्षात १०%सुद्धा झाली नव्हती. २००४मध्येसुद्धा असाच वाईट अनुभव आला होता. संस्थेचे वातावरण खूपच गढुळले होते. मी १९९५ ते १९९९ या कालावधीत बालभारतीचा संचालक होतो. तो अनुभव लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एकदा माझ्याकडे बालभारतीची जबाबदारी सोपवली. इतर पावले उचलण्याबरोबरच मी, मुख्यालयाचे सर्व अधिकारी आणि बालभारतीचे सर्व भांडार प्रमुख यांनी पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्याचे ध्येय साध्य करीपर्यंत दोन गोष्टी कटाक्षाने पाळायच्या असे ठरवले. एक कितीही मोठा पाहुणा आला तरी त्याचे स्वागत करताना पुष्पगुच्छ द्यायचा नाही आणि दुसरे कोणताही समारंभ साजरा करायचा नाही. माझ्यासाठी आणखी एक नियम मी ठरवून घेतला होता; तो म्हणजे मी ए.सी. वापरणार नाही.
 मॅडम त्यावेळी केंद्र शासनाच्या शिक्षण सचिव होत्या. मे २००५मध्ये त्या एकदा एका कामासाठी पुण्याला आल्या होत्या. त्यावेळी त्या माझ्याकडे बालभारतीत आल्या. २००५मध्ये उन्हाळा खूपच कडक होता. घामाच्या धारा वाहत होत्या. त्यांचे लक्ष मधूनमधून खोलीतल्या एअर कंडिशनरकडे जात होते. मी म्हटले, “एअर कंडिशनर नं? तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे.” “मग वापरत का नाही?” त्या म्हणाल्या. मी त्यामागची कारणमीमांसा सांगितली. म्हटले, “अशा गोष्टींमुळे परिस्थितीत बदल होतो की नाही ते माहीत नाही.” “नको.” त्या म्हणाल्या, “तुम्ही हे व्रत घेतलं आहे. व्रताची ताकद फार मोठी असते. ते असं मध्येच सोडू नका.”
मॅडमचा कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्यावर विश्वास नव्हता. पण त्यांचा पिंड आध्यात्मिक होता. शिक्षण हे त्यांचे व्रत होते. सेवानिवृत्तीनंतरही शेवटपर्यंत त्यांनी ते सुरूच ठेवले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचच्या कामात मलाही त्यांनी २००८पासून सहभागी करून घेतले. त्यावेळी माझी मानधनाबद्दल काही अपेक्षा आहे काय असा प्रश्न विचारला. मी त्यांना म्हणालो, “बहुतेकांना संगीत, नाटक, चांगले चित्रपट, भारत किंवा भारताबाहेर प्रवास अशा त्यांच्या आवडीच्या चांगल्या गोष्टी करण्यासाठीही पैसा खर्च करावा लागतो. शिक्षणक्षेत्रात काम करणं ही माझी आवड आहे. पैसा खर्च न करता ते करायला मिळणार असेल तर आणखी काय पाहिजे? मला मानधन नको.” त्यांनी समाधानाने मन डोलावली. “मला माहीत होतं हे. तरीही विचारलं. मीसुद्धा अशाच भावनेनं काम करते.” त्या म्हणाल्या.
मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कितीतरी कार्यक्रम आयोजित केले. मॅडमचे मार्गदर्शन, त्या आहेत ही भावनाही आमच्यासाठी मोठाच आधार असायचा. आताही मध्येच कधीतरी त्यांना काही विचारावे, सांगावे असा विचार मनात येतो आणि लगेच त्या आता आपल्यात नाहीत हे लक्षात येते; आणि मन उदास होते.
- डॉ. वसंत काळपांडे
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा