शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

मागे वळून पाहताना

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या 'जीवन शिक्षण' या मासिकाच्या फेब्रुवारी, २०१२च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. १४ जानेवारी १९६४ रोजी शिक्षणशास्त्र संस्थेची (आताची महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद किंवा विद्या परिषद) स्थापना झाली. जानेवारी २०१३ ते पासून या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने परिषदेने 'जीवन शिक्षण'मध्ये 'मागे वळून पाहताना' ही लेखमाला सुरू केली आहे.या लेखमालेतील हा दुसरा लेख पहिला लेख (पुनर्मुद्रित) डॉ. चित्राताई नाईक यांचा होता. तो जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाला होता. 



महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी माझा संबंध तीन नात्यांनी आला. जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक होण्यापूर्वी एक प्रशिक्षणार्थी म्हणून, परिषदेच्या कार्यक्रमांशी संबध येणारा एक अधिकारी म्हणून आणि परिषदेचा संचालक म्हणून.
१९७२ मध्ये एम. एससी. झाल्या-झाल्याच माझी महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट – अ मध्ये  निवड झाली. १९७२मध्ये गट-अ आणि ब मिळून एकूण ३५ जणांची निवड झाली होती. आमच्यापैकी कोणीच बी.एड. नसल्यामुळे आम्हांला मुंबईच्या एस. टी. कॉलेजमध्ये बी. एड.साठी   पाठवण्यात आले होते. मार्च १९७३मध्ये बी.एड.ची परीक्षा झाल्यानंतर प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी एक महिना विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांत पाठवले होते. मी अमरावतीला हा अनुभव घेतला. त्यानंतर मे आणि जून हे दोन महिने एससीईआरटी (त्यावेळची राज्य शिक्षणशास्त्र संस्था) मध्ये प्रशिक्षण होते. ही माझी या संस्थेला आणि पुण्यालाही पहिलीच भेट होती. ग. ह. पाटील मार्गावरील ही संस्था पूर्वीच्या शासकीय अध्यापक विद्यालयात सुरू होती. ‘माझ्या मामाची रंगीत गाडी’ या मुलांच्या आवडत्या कवितेचे कवी कै. ग. ह. पाटील या अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य होते हे या वेळीच समजले.  १९७२मध्ये श्री. वि. वि. चिपळूणकर हे संस्थेचे संचालक होते. या प्रशिक्षणात संस्थेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये चालणारे कामकाज जवळून पाहायला मिळाले. पुणे शहरातील आणि राज्याच्या इतर भागातील संस्था, चांगल्या शाळा आणि प्रकल्प यांनाही भेटी आयोजित केल्या होत्या. नाशिकचे शासकीय विद्यानिकेतन (आता ते धुळ्याला आहे), खिरोदा, विलास साळुंखे यांचा जलसंधारण प्रकल्प यांचा खास उल्लेख करावासा वाटतो. कोठारी आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास आणि त्यावर आम्ही केलेली सादरीकरणे मला आजही आठवतात. क्रमान्वित अध्ययन ही आमच्यासाठी त्यावेळी अगदी नवीन संकल्पना होती.  या कालावधीत सर्वात महत्त्वाचा भाग होता तो रोज रात्रीच्या जेवणानंतर चिपळूणकर सरांनी घेतलेली बौद्धिके. शिक्षण खात्याचा अधिकारी इतर खात्यांपेक्षा वेगळा कसा, विकासात्मक प्रशासन म्हणजे काय, अधिकाऱ्यांनी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी काय करायला हवे, सार्वजनिक जीवनात कसे वागावे अशा अनेक बाबतीत त्यांनी आम्हांला मार्गदर्शन केले. या शिदोरीचा आम्हांला कायम उपयोग झाला. ना. गो. शुक्ल यांच्याकडून सोप्या पद्धतीने मुलांना वाचन कसे शिकवायचे हे समजले. इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील ‘लाल टांगेवाला’ ही त्यांची कविता मुलांना खूपच आवडायची. डॉ. एन. के. पाटोळे, ना. अ. वझे, गुळवे, अ. ज. पवार, एन. बी. भोसले यांच्याशी झालेल्या चर्चा आम्हा सर्वांनाच खूप चांगल्या आणि उपयोगी वाटायच्या.
दोन महिन्यांच्या या प्रशिक्षणानंतर आम्हांला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळाले. माझी नियुक्ती अहमदनगर जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी म्हणून झाली. प्राथमिक शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण हा त्यावेळी नव्यानेच सुरू झालेला कार्यक्रम. बहुतेक शासकीय आणि  काही निवडक अशासकीय अध्यापक विद्यालयांमध्ये हे सेवांतर्गत प्रशिक्षणाचे वर्ग होते. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ३० होती. पण कोणत्याही वर्गात १५पेक्षा जास्त शिक्षक नसायचे. अहमदनगर  जिल्ह्यातही हीच अवस्था होती. हा अपव्यय टाळण्यासाठी पहिल्याच दिवशी ३० शिक्षक हजर राहतील या दृष्टीने मी एक कार्ययोजना तयार केली. ती १००% यशस्वी झाली. या पद्धतीनेच जिल्हा स्तरावर कार्यवाही व्हावी या दृष्टीने राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळामार्फत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. एसआयई हे शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहविचार सभांचे हक्काचे ठिकाण असायचे.  पूर्वी एसआयईमार्फत ‘Research Bulletin’ हे त्रैमासिक प्रकाशित व्हायचे. या त्रैमासिकात माझा ‘application of Getzels’ Model to the Rapport-based Programme of School Improvement’ हा संशोधनपर लेख १९८०मध्ये प्रकाशित झाला होता.
  १९८२मध्ये मी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विश्वविद्यालयात प्रतिनियुक्तीवर गेलो. दिल्लीला जाताना प्रा. के. पी. सोनवणे शिक्षणशास्त्र संस्थेचे संचालक होते. सुमारे चार वर्षांनंतर मी महाराष्ट्रात परत आलो. मला मंत्रालयात उपसचिव म्हणून पोस्टिंग मिळाले होते. श्री. सोनवणेसुद्धा त्यावेळी मंत्रालयात उपसचिव जून १९८५मध्ये आले होते. मधल्या काळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे रूपांतर महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असे झाले होते. विज्ञान शिक्षण संस्था, आंग्लभाषा शिक्षण संस्था, व्यवसाय मार्गदर्शन संस्था, दृक्श्राव्य शिक्षण संस्था या सर्व संस्था परिषदेच्या अधिपत्याखाली आल्या. परिषदेचे पहिले संचालक डॉ. वसंतराव नागपुरे यांनी अतिशय धडाडीने काम सुरू केले. बालचित्रवाणी ही संस्था त्यावेळी परिषदेच्या अधिपत्याखालीच काम पहायची. डॉ. नागपुरे यांनीच राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेचे ‘बालचित्रवाणी’ असे सुटसुटीत नाव ठेवले. “मुलामुलींची मजेमजेची बालचित्रवाणी l आम्ही पाखरे आनंदाने गातो गंमतगाणी ll” हे शीर्षकगीतही त्यांनीच तयार करवून घेतले होते. परिषदेच्या सभागृहाचे ‘महात्मा फुले सभागृह’ हे नावही त्यांनीच ठेवले. बाहेरून परिषदेत येणाऱ्या लोकांचीही या सुटसुटीत नावामुळे खूप सोय झाली. कुमठेकर रोडवर एसआयई किंवा एससीआरटी कुठे आहे विचारल्यावर कोणीच काही सांगू शकत नाही; पण महात्मा फुले सभागृह कुठे आहे हे विचारले तर बहुतेकांना माहीत असते. त्यापूर्वी ‘ट्रेनिंग कॉलेज’ असा पत्ता सांगावा लागायचा. आता ‘विद्या परिषद’ हे सुटसुटीत नावही लोकांच्या तोंडी रुळेल काय? १९८६चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले त्यावेळी डॉ. नागपुरेच परिषदेचे संचालक होते. नवीन शैक्षणिक धोरण जाहीर होण्यापूर्वी ‘Challenge of Education’ ही श्वेतपत्रिका, संसदेने संमत केलेले ‘National Policy on Education 1986’ हे प्रत्यक्ष धोरण आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेला ‘Programme of Action’ हा कृतिकार्यक्रम हे या धोरणाचे तीन टप्पे आणि हे त्या टप्प्यांचे फलित असलेले तीन दस्तऐवज होते. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील लोकांना समजायला सोपे जावे म्हणून त्यांनी तीनही दस्तऐवाजांचा संग्रह ‘शैक्षणिक आव्हानाकडून कृतिकार्यक्रमाकडे’ या शीर्षकाखाली मराठीत प्रकाशित केला. महाराष्ट्राचा चाळीस वर्षांचा इतिहास, मुलींचे शिक्षण, Resources for Education’ या विषयांवरही त्यांनी अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित केली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी सुरू केलेला ‘मातृप्रबोधन प्रकल्प’ उल्लेखनीय असाच होता. याच कालावधीत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम १९९८८ तयार होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अभ्यासक्रम विकसन कसे होते याचा वस्तुपाठच यावेळची सगळी प्रक्रिया अभ्यासली म्हणजे मिळतो. मंत्रालयात रुजू झालो त्यावेळी एससीईआरटीशी संबंधित काम श्री. सोनवणे यांच्याकडे होते. माझ्याकडे श्री. सोनवणे यांच्या मानाने कमी काम असल्यामुळे मी एससीईआरटीशी संबंधित काम त्यांना विनंती करून मागून घेतले आणि त्यांनीही त्याला संमती दिली. त्यामुळे परिषदेत झालेल्या कार्याशी माझा जवळचा साक्षीदार म्हणून तर संबंध आलाच, परंतु ज्या ज्या ठिकाणी शासनाची मान्यता आवश्यक होती त्या त्या ठिकाणी माझी थोडीफार मदत होऊ शकली याचेही मला समाधान आहे.
डिसेंबर १९९४मध्ये श्री. सु. सा. साळगावकर यांच्या जागी माझी बालचित्रवाणीतून परिषदेच्या संचालकपदी बदली झाली. त्यापूर्वीच परिषदेत स्त्री शिक्षण कक्ष स्थापन झाला होता. शकुंतला काळे, शुभदा वाबळे, सविता फटाले या अतिशय मनापासून काम करणाऱ्या अधिकारी या कक्षाला लाभल्या. त्या काळात जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाखाली खूप काम झाले. जीवन शिक्षण प्रकाशनचे काम सावित्री खोले पहायच्या. ‘जीवन शिक्षण’ हे प्राथमिक शिक्षकांच्या दूरशिक्षणाचे एक प्रभावी साधन आहे असा माझा सुरवातीपासून ठाम विश्वास आहे. शिक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना उपयोगी पडणाऱ्या विषयांवर अंक प्रकाशित करावेत या दृष्टीने ‘जीवन शिक्षण’चे दोन विशेषांक प्रकाशित केले. एक – वाचनकौशल्य विशेषांक आणि दोन – वाचनाचा श्रीगणेशा. वाचनाचा वेग आणि शिकण्याचा वेग यांचा थेट संबंध असतो. हे लक्षात घेऊन ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या मदतीने ‘वाचनकौशल्य विशेषांक’ तयार केला होता. इयत्ता पहिलीमध्ये वाचनाची सुरवात अक्षरे, शब्द, वाक्य यांपैकी कशापासून करायची याबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. यावरच ‘वाचनाचा श्रीगणेशा’ हा विशेषांक होता. १९९४मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री श्री. सलीम झकेरिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केला होता. या टास्क फोर्सच्या अहवालाचा सारांश परिषदेने याच काळात प्रकाशित केला. याच काळात युनिसेफच्या मदतीने परिषदेच्या अधिकाऱ्यांसाठी पानशेत येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. या प्रशिक्षणाचे स्वरूप अगदीच वेगळे होते. परिषदेचे अधिकारी हे प्रशिक्षणार्थी तर होतेच, पण तेच प्रशिक्षकही होते. त्या काळात पॉवर पॉइंट  प्रेझेन्टेशनची सोय नव्हती. म्हणून ओव्हर हेड प्रोजेक्टरवर पारदर्शिकांच्या मदतीने सर्व अधिकाऱ्यांना सादरीकरण करायला सांगितले. मी स्वत:सुद्धा माझे सादरीकरण ओव्हर हेड प्रोजेक्टरवरच केले. युनिसेफच्या विजयाताई चौहान, त्यावेळच्या शिक्षण सचिव डॉ. कुमुद बन्सल आणि चिपळूणकर सर दोन्ही दिवस या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. हा आगळा वेगळा प्रशिक्षण वर्ग अतिशय यशस्वी झाला होता. या प्रशिक्षण वर्गात झालेल्या चर्चांच्या आधारे परिषदेचा पुढच्या पाच वर्षांत कसा विकास करायचा याचा एक आराखडाही आम्ही ‘संकल्प-२०००’ या शीर्षकाखाली तयार केला होता. परिषदेचे त्यावेळचे उपसंचालक सुभाष पाटणकर, प्रशासनाधिकारी शिवाजी सरनोबत, नव्यानेच परिषदेत रुजू झालेले शिवाजी तांबे आणि दिनकर पाटील आणि यापूर्वी ज्यांचा उल्लेख केला आहे ते माझे त्यावेळचे सहकारी यांच्या धडाडी आणि उत्साहामुळे माझे काम खूपच सोपे असायचे. माझे पी. ए. म्हणून काम करणाऱ्या अस्मिता पाटणकर आणि पावर यांचीही खूपच मदत असायची. पण परिषदेत प्रदीर्घ काळ काम करणे माझ्या नशिबी नव्हते. केवळ नऊ महिन्यांच्या आतच ३० सप्टेंबर १९९५ रोजी माझी बदली बालभारतीचा संचालक म्हणून झाली.
याचवेळी क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम १९९५ची अंमलबजावणी सुरू झाली. इयत्ता पहिली आणि दुसरीची नव्या अभ्यासक्रमावर आधारलेली पाठ्यपुस्तके बाल भारतीने १९९७मध्ये प्रकाशित केली. त्यांच्यावर आधारलेले प्रशिक्षण परिषदेने घेतले. विजय पाटील यांच्यानंतर विजय देऊस्कर यांनी नुकतीच परिषदेचे संचालक म्हणून जबादारी स्वीकारली होती. ऑक्टोबर १९९७ अखेरीस ते सेवानिवृत्तही झाले. परंतु या अल्प कालावधीत त्यांनी ‘स्मार्ट-पीटी’ ही शिक्षक प्रशिक्षणाची अभिनव पद्धतीची फार मोठी देणगी शिक्षणक्षेत्राला दिली. १५ वर्षांचा कालावधी उलटूनही ‘स्मार्ट-पीटी म्हणजेच शिक्षक प्रशिक्षण’ हे  समीकरण सर्वांच्या पक्के ठसले आहे. आकाशातील प्रकाशमान कडाडणाऱ्या विजेचे अस्तित्व क्षणभराचे असते, पण तिची आठवण मात्र प्रदीर्घ काळ आपल्या मनात राहते. तसेच विजय देऊस्कर यांच्या एससीईआरटीमधील अल्प कारकिर्दीबद्दल म्हणता येईल.
त्यानंतरही अनेक आठवणी आहेत. पण त्या सर्व शब्दमर्यादेमुळे येथे देणे शक्य नाही. मी महाराष्ट्र प्राथमिक परिषदेचा संचालक असताना परिषदेच्या नव्या वसतीगृहाचे बांधकाम झाले. २०००च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित अभ्यासक्रम आणि त्यावर आधारित पाठ्यपुस्तकांची सुरवात या नंतर मी २००८मध्ये सेवानिवृत्त झालो. पण त्यानंतरही माझे परिषदेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध संपले नाहीत. परिषदेचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. १९९५मध्ये पानशेत येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गाच्या वेळी मी म्हणालो होतो की आपल्या सर्वांना आपल्या संस्थेचा आणि आपण करत असलेल्या कामाचा अभिमान वाटायला पाहिजे. आपले काम PRIDE या शब्दात सांगता येते:-
P – Production/Publications (Jeevan Shikshan and other material in any format for teachers and other functionaries engaged in school education)
R – Research
I – Innovations (By SCERT faculty, teachers and other functionaries, including development of new formats, procedures and methodologies)
D – Development (of personnel through pre-service and in-service training and other methods)
E - Extension Services
 या पाचही अंगांनी आपण काम करत राहिलो आणि त्याचा आढावा घेत राहिलो तर संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनाच काय, तर संस्थेशी संबंध येणाऱ्या कोणालाही संस्थेबद्दल अभिमानाच वाटेल. 
- डॉ. वसंत काळपांडे,
***



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा