१४ व १५ एप्रिल, २०१२ला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान पुणे येथे आयोजित केलेल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत हा लेख प्रकाशित झाला होता.
डॉ. वसंत काळपांडे
१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. मला लहानपणासूनच –अगदी शाळेत जायच्या आधीपासून- वाचायची खूप आवड होती. वाचायला जे जे मिळेल ते मी अधाशासारखे वाचून काढत असे. त्यावेळी किराणामाल वर्तमानपत्रांच्या कागदांच्या पुड्यांतून मिळायचा. घरी आल्यानंतर वर्तमानपत्राचे तुकडेसुद्धा मी वाचत असे. पाठ्यपुस्तकांतील कविता वर्गात शिकवण्याबरोबरच चालींसह पाठ करून घेण्यावर त्या काळात शिक्षकांचा भर असायचा. त्यामुळेच आजही पहिलीपासून अकरावीपर्यंतच्या अनेक कविता माझ्या तोंडपाठ आहेत.
१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. मला लहानपणासूनच –अगदी शाळेत जायच्या आधीपासून- वाचायची खूप आवड होती. वाचायला जे जे मिळेल ते मी अधाशासारखे वाचून काढत असे. त्यावेळी किराणामाल वर्तमानपत्रांच्या कागदांच्या पुड्यांतून मिळायचा. घरी आल्यानंतर वर्तमानपत्राचे तुकडेसुद्धा मी वाचत असे. पाठ्यपुस्तकांतील कविता वर्गात शिकवण्याबरोबरच चालींसह पाठ करून घेण्यावर त्या काळात शिक्षकांचा भर असायचा. त्यामुळेच आजही पहिलीपासून अकरावीपर्यंतच्या अनेक कविता माझ्या तोंडपाठ आहेत.
पाचवी ते आठवी मी
अमरावतीच्या ‘सायन्सकोर’, तर पुढे अकरावीपर्यंत ‘कलानिकेतन’ या सरकारी शाळांमध्ये
शिकलो. ‘सायन्सकोर’मध्ये शिकत असताना आम्ही वाचनालयात बसत असू. तेथे मुलांसाठी ‘मुलांचे
मासिक’, ‘शालापत्रिका’, ‘कुमार’, ‘फुलबाग’ अशी अनेक मासिके ठेवलेली असायची.
वर्गवाचनालयाचीही सोय होती. गो. नी. दांडेकर, भा. रा. भागवत, नाथमाधव, हे
त्यावेळचे माझे आवडते लेखक. अनेक इंग्रजी पुस्तकांची भाषांतरेही मी त्या काळात वाचली.
कलानिकेतनमध्ये
भैयासाहेब निंबेकर आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवायचे. त्यांच्याकडे ग्रंथालयाचाही
कार्यभार होता. त्यांनी मला कोणतीही पुस्तके घरी न्यायची परवानगी दिली होती. या
काळात मी एका लेखकाची पुस्तके वाचायला सुरवात केली की, त्याची सर्व पुस्तके वाचून
काढत असे. त्यामुळे लेखकाची लेखनशैली चांगली कळायची. मुन्शी प्रेमचंद, रामधारी
सिंह ‘दिनकर’, मैथिली शरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुभद्रा कुमारी
चौहान हे हिंदीचे माझे आवडते लेखक आणि कवी होते. विदर्भात त्याकाळात हिंदी-मराठी
सरमिसळ मोठ्या प्रमाणात असायची. अनेक मराठी गोष्टींमध्ये पात्रांच्या तोंडी हिंदी
संवाद असायचे. या सर्व गोष्टींबद्दल कोणाचाही आक्षेप नसायचा; मराठीवर हिंदीचे
आक्रमण झाले अशी तक्रार नसायची. रहस्यकथा
लेखक बाबुराव अर्नाळकर यांचा माझ्या पिढीची वाचनाची आवड घडवण्यात मोठा वाटा होता.
त्यांच्या रहस्यकथा मी याच काळात वाचायला लागलो. याच काळात शाळेच्या ग्रंथालयात
असलेली विज्ञान आणि गणितावरची अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके मी वाचून काढली.
अनेक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांच्या जीवनावरील पुस्तके मी याच काळात वाचली.
आकाशनिरीक्षणावरील पुस्तके, वेगवेगळ्या नक्षत्रांवरील भारतीय आणि ग्रीक पुराणकथा
वाचल्या. मी कोणती पुस्तके वाचावी यांवर शाळेत किंवा घरी कोणतेही बंधन नव्हते.
चांगले संस्कार व्हावेत यासाठी दर्जेदार पुस्तकेच वाच असा आग्रह नव्हता. चांगल्या
साहित्याबरोबरच सुमार दर्जाचेही साहित्य मी वाचले. तरीही चांगल्या आणि वाईट
साहित्यांतील फरक कळण्यात मला कोणतीच अडचण आली नाही.
* * *
सायन्सकोरमध्ये
कमलताई डांगे आणि देशपांडे या दोन शिक्षिका शाळेच्या हस्तलिखिताच्या संपादनात माझी
मदत घ्यायच्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी काही कथा आणि कविता लिहिल्याही. पण
ललित लेखन हा माझा पिंड नाही, हे लवकरच माझ्या लक्षात आले. माझे वाचन भरपूर असले
तरी मला पल्लेदार, अलंकारिक भाषेत लिहिणे मला कधी जमायचे नाही. मी बरेचदा मला
चांगल्या वाटणाऱ्या लेखकांच्या लेखनशैलीचे अनुकरण असे. इयत्ता नववीमध्ये माणिकचंद
नेमासा कानेड आम्हांला मराठी शिकवायचे. एकदा त्यांनी आम्हांला ‘उन्हाळ्याची
सुट्टी’ या विषयावर विनोदी निबंध लिहायला सांगितला होता. माझा निबंध वाचल्यानंतर
ते म्हणाले होते, “ निबंध छान झाला; पण आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाही; वसंत काळपांडे आहोत हे
लक्षात ठेवावं.” कानेडसरांचा मुलांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या शैलीत लिहिण्यावर भर असायचा. लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे
त्यासाठी स्वत:ची शैली शोधायला हवी असे ते म्हणायचे.
मला माझ्या
भाषाशैलीचा शोध लागला तो सरदेशमुख सरांमुळे. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवायचे.
साध्या, सरळ, कमीतकमी शब्दांचा वापर असणाऱ्या, ओघवत्या, अनलंकृत आणि आपल्याला जे
काही सांगायचे त्याचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या भाषाशैलीवर त्यांचा
भर होता. पुस्तकातला मजकूर पाठ करून जसाच्या तसा लिहिण्याऐवजी तो स्वत:च्या भाषेत
लिहावा आणि भाषेच्या आणि अचूकतेच्या दृष्टीने नऊ वेळा तरी तपासावा अशी त्यांची
शिकवण असायची. एखादा विद्यार्थी पुस्तकातील बोजड वाक्ये जशीच्या तशी वापरू लागला
तर ते म्हणायचे, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” सरदेशमुखसर आणि कानेडसर यांच्यामुळे माझी भाषा घडली. शाळेत असतानाच इंग्रजी
पुस्तकांत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी लिहिलेले विज्ञानावरचे काही लेख ‘अमृत’, ‘श्रीयुत’
आणि ‘नवनीत’ या मराठी डायजेस्टमध्ये छापून यायला लागले होते. एस.एस.सी.च्या
परीक्षेत मला इतर विषयांबरोबर मराठीतही डिस्टिंक्शन मिळाले होते. त्याकाळी नागपूर
विद्यापीठात बी.एससी.च्या पहिल्या वर्षापर्यंत(बी.ए.प्रमाणेच) मराठी हा विषय अनिवार्य होता. या परीक्षेत त्यावर्षी
विद्यापीठात केवळ दोनच विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन होते. एक आर्ट्सची
विद्यार्थिनी होती, तर दुसरा मी. महाविद्यालयाच्या वार्षिकात मी पुंज सिद्धांता(Quantum
Theory)वर, तसेच मॅक्स प्लँक आणि रदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या
जीवनांवर मराठीत लेखही लिहिले होते.
* * *
पण त्यानंतर वेगळे
अनुभव आले. १९७२ मध्ये एम. एससी. झाल्यानंतर मी एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर
अहमदनगरला १९७३ मध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालो. १९६४ चा महाराष्ट्र राजभाषा
अधिनियम १९६५ पासून लागू झाला असला तरी १९७८ पर्यंत सरकारी पत्रव्यवहार आणि
बैठकांमध्ये वापरली जाणारी भाषा प्रामुख्याने इंग्रजी असायची. १९७८ नंतर शरद पवार
आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सरकारी व्यवहारांत मराठीचा वापर खूपच वाढला.
त्यानंतरच्या काळात मी काही अहवाल मराठीतून लिहिले. ‘अहवाल अभ्यासपूर्ण आहे, पण
आणखी ‘प्रगल्भ’, ‘डौलदार’ भाषा वापरली
असती तर चांगले झाले असते.’ असे शिक्षण
विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकारी किंवा माझे काही सहकारी मला सांगायचे. अशा
वर्णनाची भाषा कशी असते ते मला माहीत होते; पण ती वापरण्याचे कौशल्य मात्र माझ्याकडे
नव्हते आणि आजही नाही. अशा अभिप्रायांमुळे माझ्यात काही प्रमाणात का होईना पण
न्यूनगंड निर्माण व्हायचा.
* * *
१९८०-८१ मध्ये मी
कोल्हापूर विभागाचा शिक्षण उपसंचालक असताना माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर
कर्मचा-यांचा, म्हणजे लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आणि शिपाई यांचा कार्यभार
अजमावून आकृतिबंध ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण संचालक श्री. वि. वि.
चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती. मी या
समितीचा सदस्य-सचिव होतो. व्यवस्थापन शास्त्रातील कार्यमापन तंत्राचा शास्त्रशुद्ध
वापर करून आम्ही निकष ठरवले होते. सगळा अहवाल मीच मराठीत लिहिला. शासनाला सादर
करण्यापूर्वी चिपळूणकरसरांना दाखवला. सर म्हणाले, “एवढ्या रुक्ष वाटणाऱ्या विषयावर इतका शास्त्रशुद्ध
आणि ओघवत्या शैलीतला अहवाल मी पहिल्यांदाच वाचतो आहे.”
“सर, हा अहवाल भाषेच्या दृष्टीनी कोणाला दाखवायचा काय?” मी विचारले. “कशाला?” ते म्हणाले. “भाषा आणखी डौलदार होऊ शकेल.” मी उत्तरलो. ते हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट
सांगितली.
प्रख्यात गायक कै. पंडित वसंतराव देशपांडे यांचे अनेक गुरु होते. एका
गुरुंकडून शिक्षण संपवून निरोप घेऊन ते निघताना म्हणाले, “मला तुम्ही तुमच्याकडचं सगळं
ज्ञान तुम्ही मला दिलं.” “सगळं नाही दिलं. एक गोष्ट अजून नाही सांगितली. कसं गायचं याचं माझ्याकडे
असलेलं खरं गुपित मी तुला अजून सांगितलं नाही.” गुरुजी म्हणाले. पंडितजी आश्चर्याने पाहत राहिले. त्यांचे गुरु म्हणाले, “तू जसा बोलतोस
तसाच गा. हेच ते गुपित.”
चिपळूणकरसर म्हणाले “आपल्या सर्वच कामांत अशीच सहजता असली पाहिजे. आपलं
लिखाणही तसंच असावं. तुम्ही लिहिलेल्या अहवालात यत्किंचितही बदल करण्याची आवश्यकता
नाही. असंच लिहीत जा.” ज्यांच्या कामाबरोबरच, ज्यांच्या
भाषणांमुळे आणि लेखनामुळे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती आणि आजही आहे त्या
चिपळूणकरसरांचे हे प्रमाणपत्र मिळताच माझा न्यूनगंड कुठल्याकुठे पळून गेला.
त्यानंतर मी चार वर्षे दिल्लीला होतो. परत आल्यानंतर शैक्षणिक धोरणावर आणि
शैक्षणिक प्रशासनावर मराठीत अनेक लेख लिहिले. १९९२मध्ये ‘शालेय प्रशासन आणि मानवी
संबंध’ हे माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाले. त्यापूर्वीची पुस्तके इंग्रजीत
होती. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा
वाङ्मय पुरस्कार मिळाला.
आजही मी लिहीत
असताना
“लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे.”
“ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.”
“ आपण लिहिलेला मजकूर नऊ वेळा तरी तपासावा.”
ही कानेडसर आणि सरदेशमुखसर यांची वाक्ये माझ्या कानांत घुमत
असतात.
* * *
छान सर
उत्तर द्याहटवाछान सर
उत्तर द्याहटवा