मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

प्रगतिपुस्तक ठरवणार शाळांची गुणवत्ता


शाळांच्या परिणामकारकतेच्या निकषांचे मापन होणार 

म. टा. प्रतिनिधी, पुणे 

विद्यार्थ्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या शाळेमधील अंतर किती... शाळेच्या व्हरांड्यामधील भिंती शैक्षणिकदृष्ट्या बोलक्या आहेत का... शाळेने शिक्षणाधिका-यांशी केलेल्या पत्रव्यवहारांच्या नोंदी कशा प्रकारे ठेवल्या जातात... शाळेला क्रीडांगण आहे का... शालाबाह्य उपक्रमांमध्ये शाळेचा सहभाग कशा प्रकारे असतो... 

वरवर पाहता अगदी साधे वाटणारे हे प्रश्न आता शाळांच्या प्रगतिपुस्तकामध्ये त्यांना अधिक चांगल्या ग्रेड्स मिळवून देऊ शकतात. कारण आता शाळेच्या नानाविध बाबींशी निगडित मूल्यांकनावर आधारित गुणवत्ता ठरवू शकणारे 'शाळांचे प्रगतिपुस्तक' उपलब्ध झाले आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने शाळांच्या प्रगतीसाठी आवश्यक अशा सर्व निकषांवर आधारित हे 'शाळांचे प्रगतिपुस्तक' तयार केले आहे. पुण्यात शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्याचे प्रकाशन करण्यात आले. 

एरव्ही सगळीकडेच शाळांच्या गुणवत्तेविषयी नुसती चर्चा होताना दिसते; पण कोणीही शाळांच्या गुणवत्तेचे आणि परिणामकारकतेचे मापन करू शकणाऱ्या निकषांचा विचार करत नाही. हीच बाब लक्षात घेत मंचाने हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकामध्ये शाळांची परिणामकारकता, त्याचे समाजामध्ये उमटणारे प्रतिबिंब, सर्वांगीण शालेय विकासासाठी आवश्यक प्रतवारी, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी स्वयंमूल्यमापन आणि स्वयंविकास कार्यक्रम, शाळेच्या परिणामकारकतेच्या मापनासाठीची प्रश्नावली, माध्यमिक शाळांच्या प्रतवारीसाठीची प्रश्नावली, संस्था, भौतिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शाळांच्या श्रेणी निश्चितीसाठीचे निकषही त्यात पुरविण्यात आले आहेत. तसेच, पुण्याच्या महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शाळांच्या मूल्यमापनासाठी तयार केलेल्या 'माझी समृद्ध शाळा' विषयक प्रश्नसूचीचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 

या पुस्तकाचे संपादक आणि माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, 'शाळांची गुणवत्ता एका विशिष्ट पातळीपर्यंत आणून त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी अशा प्रकारचे प्रगतीपुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक प्रशासक, संशोधक आणि शैक्षणिक धोरणे ठरविणाऱ्यांसाठी हे प्रगतिपुस्तक उपयुक्त ठरू शकते. सध्या या उपक्रमाची सुरुवात आहे. आम्ही एसएससी बोर्ड आणि एससीईआरटीशी या उपक्रमाच्या उपयुक्ततेविषयीची बोलणी केलेली आहे. भविष्यात उपक्रमाच्या व्यापक अंमलबजावणीच्या दृष्टीने नक्कीच विचार करता येणे शक्य आहे.' 

या उपक्रमाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या प्रगतिपुस्तकासाठी शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या डॉ. काळपांडे, डॉ. सुनीता चुग, सजेर्राव जाधव, वि. वि. चिपळूणकर, बसंती रॉय आदींनी काम केले आहे. डॉ. कुमुद बन्सल यांनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे. 

काही निकष 

मनुष्यबळ 

भौतिक सुविधा आणि पायाभूत सोयी 

शैक्षणिक तंत्रज्ञानाची उपलब्धता 

आथिर्क स्त्रोत आणि अर्थबळ 

माजी विद्यार्थी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा