रविवार, २३ डिसेंबर, २०१२

मुलांना तारतम्याने वागवा

सकाळ Thursday, November 29, 2012
मुंबई- मुलांची अतिरिक्त ऊर्जा पूर्वी शाळेव्यतिरिक्तच्या मोकळ्या वेळेत खेळ आणि अन्य गोष्टींकडे वळती होत होती. तो फावला वेळच क्‍लासेस आणि अभ्यासाने हिरावून घेतल्यामुळे मुले शाळेत मस्ती करतात. मुलांना कसे वागवायचे, याचे तारतम्य मोठ्यांना हवे. त्यांना नकारात्मक वागणूक दिली नाही, कमी लेखले नाही, तर वर्तनसंहितेची आवश्‍यकताच भासणार नाही. विद्यार्थ्यांचे वर्तन ठरविण्याआधी आपण कसे वागतो आणि लहानांना कसे वागवतो याचा विचारही मोठ्यांनी करायला हवा, असा विचार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय परिषदेतील चर्चेत आज पुढे आला.

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त "शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्तनसंहिता' या विषयावर शालेय शिक्षण विभाग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आहे. माजी सनदी अधिकारी शरद काळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे माजी संचालक वसंत काळपांडे, बसंती रॉय आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षकांनी मुलांना शिक्षा केल्यास त्याविरोधात "कॉर्पोरल पनीशमेंट ऍक्‍ट' येऊ घातलाय. त्या पार्श्‍वभूमीवर मुलांच्या शालेय वर्तनाबाबत कोणतीच संहिता आपल्याकडे नाही. म्हणून या परिषदेत हा विषय घेण्यात आला. प्रसिद्घ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या वागणुकीची मानसशास्त्रीय बाजू समजावून सांगितली. परीक्षा पद्घतीत झालेल्या आमूलाग्र बदलानंतर शिक्षणात गुणवत्तेला महत्त्व आले. पर्यायाने मार्गदर्शन करणारे कोचिंग क्‍लासेस भारंभार वाढले आणि मुले "तयार' केली जाऊ लागली. परिणामी गुणवत्ता मात्र कमी झाली. मुलांचा शाळेनंतरचा मोकळा वेळ खेळासाठी, अवांतर वाचण्यासाठी हवा, तो कोचिंग क्‍लासेसला जाऊ लागल्याने मुलांची रग जिरण्यासाठी वाव नसतो आणि ती मग वर्गात मस्ती करू लागतात.

अनेक मुले अध्ययन अक्षम असतात. अशा मुलांची दुसरीकडे वळणारी ऊर्जा सकारात्मकतेकडे कशी वळवायची याची कोणतीच योजना शाळांमध्ये नाही. नंतरच्या परिसंवादात समुपदेशकाची भूमिका समजावताना समुपदेशक शैलजा मुळे यांनी हे काम शिक्षकच उत्तम करू शकतात, असे सांगितले. यासाठी शिक्षकांना मुलांशी संवाद साधण्याचे विशिष्ट प्रशिक्षण देण्यावर बालरोगतज्ज्ञ समीर दलवाई यांनी भर दिला. मुलांच्या शिक्षांच्या संदर्भातील बालहक्क आयोगाची भूमिका राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सूर्यकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केली.

शिक्षकांनी मुलांना कठोर शिक्षा केल्यास त्यासाठी संपूर्ण संस्थेला जबाबदार धरल्यास असे प्रकार होणार नाहीत, असे कुलकर्णी म्हणाले. आयोगाबद्दल अनेक शाळांना, शिक्षकांना आणि पालकांनाही आजही माहितीच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संघर्ष योग्य पद्घतीने हाताळला नाही, तर परिस्थिती बिघडते. त्यामुळे शिक्षा ही मुलांना सुधारण्यासाठी हवी, आणखी बिघडविण्यासाठी नको, असे पोलिसांची भूमिका मांडताना सहायक पोलिस आयुक्त फिरोज पटेल म्हणाले. पालकांनी अधिक सजग व्हायला हवे, अशी पालकांची भूमिका पत्रकार शुभदा चौकर यांनी मांडली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा शिक्षण विकास मंच हा उपक्रम कल्पकतेने राबविणाऱ्या डॉ. कुमुद बन्सल यांचे अलीकडेच 5 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित "शिक्षणव्रती डॉ. कुमुद बन्सल - स्मृतिचित्रे' या पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले; तसेच प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारालाही यंदापासून डॉ. बन्सल यांचे नाव देण्यात आले आहे. नामदेव माळी यांचे शाळा भेट आणि " 10 लॉज ऑफ लर्निंग' या स्टीव्हन रुडॉल्फ यांच्या पुस्तकाच्या अश्‍विनी लाटकर यांनी केलेल्या अनुवादाला हा पुरस्कार देण्यात आला.
...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा