शुभदा चौकर, सोमवार, २७ डिसेंबर २०१०
महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाचे जाळे चांगले पसरलेले आहे. नागरी सुविधांपासून आणि पोषक वातावरणापासून दूर असलेली गावागावांतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकत आहेत. त्या शाळांची अभावग्रस्त अवस्था, तेथील शिक्षणाचा यथतथा दर्जा यांवर बरेचदा चर्चा होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही शिक्षक स्वयंस्फूर्तीने काम करत असतात. कल्पकता आणि विद्यार्थी घडवण्याची असोशी यांच्या बळावर, अडचणी दूर सारत त्यांचे काम नेकपणे चालू ठेवतात. असे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून उपक्रम राबवतात, योजना आखतात. अशा काही निवडक उपक्रमांचे संकलन मुंबईच्या ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या शिक्षण विकास मंचाने पुस्तक स्वरुपात केले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक सरकारी चौकटीत जखडलेले असतात, त्यांना स्वातंत्र्य नसते- असा एक सर्वसाधारण समज असतो. पण या पुस्तकात उल्लेखलेल्या शिक्षकांनी मात्र चौकटीतील स्वातंत्र्य कसे उपभोगायचे, याचे वस्तुपाठ घालून दिले आहेत. शासनाने आता शिक्षणधोरणात ‘कन्स्ट्रक्टिविझम’चा म्हणजे ज्ञानरचनावादाचा अंगिकार केला आहे. या धोरणाच्या चौकटीला प्रमाण मानून काही जि. प. शिक्षकांनी प्राथमिक शाळेतील मुलांना इंग्रजी भाषा शिकवणारे उपक्रम आखले. नांगनूरच्या (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) स्मिता गौड यांनी आकर्षक चित्रफलक बनवून पहिलीच्या मुलांना कितीतरी इंग्रजी शब्द शिकवले. शिरवळची (ता. खंडाळा, जि. सातारा) नूरजहॉं काझी ही शिक्षणसेविका विविध कल्पना नेटाने राबवून वर्षभरात चौथीच्या मुलांमध्ये इंग्रजी संभाषणाचा आत्मविश्वास रुजवण्यात यशस्वी झाली. वाशीच्या (ता. करवीर, जि. कोल्हापूर) वर्षां येजरे यांनी इंग्लिश वर्ड बॅंकेचा प्रयोग तिसरी ते सातवीच्या मुलांसाठी यशस्वीपणे राबवला. साधारणपणे तसाच एक उपक्रम आंबाडे गावच्या (ता. भोर, जि. पुणे) शिवाजी खोपडे आणि चिखली गावच्या (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) चंद्रकांत जंगम यांनी राबवले आहेत. ग्रामीण मराठी शाळांतील मुलांना इंग्रजी भाषा अस्खलित यावी, म्हणून प्रयत्न करणाऱ्या या शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याचप्रमाणे वनवासी भागातील काही शिक्षक बोलीभाषा-प्रमाणभाषेच्या समन्वयासाठी धडपडत आहेत. भेकरेवाडीच्या (ता. कर्जत, जि. रायगड) वेच्या गावीत यांनी बोलीभाषा, मराठी प्रमाणभाषा व इंग्रजी यांचे शब्दसंग्रह केले. अतिदुर्गम भागातील या शिक्षकाने मुलांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी केले आणि मुलांची उपस्थिती वाढवली. चिखलदरा तालुक्यातील माखला गावच्या अशोक सोनवणे यांनी कोरकू बोलीच्या मुलांच्या मराठी-विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांना चांगलेच यश मिळाले.
लहान इयत्तांतील मुलांना गणिताच्या व विज्ञानाच्या संकल्पना नीट समजाव्यात, यासाठी जि.प. शिक्षकांनी केलेले काही उपक्रम अनुकरणीय आहेत. गणिताची प्रयोगशाळा उभारणे, गणिती संकल्पना शिकवणारी साधी साधने तयार करणे, मुलांकडून विज्ञानाचे सोपे प्रयोग करून घेणे, असे उपक्रम या शिक्षकांनी राबवले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा अनेकदा शैक्षणिक साधन-संपत्तीपासून वंचित असतात. पण ‘साधनांवाचून शिक्षणाची साधना अडत नाही’ हे विनोबा भावे यांचे वचन या काही शिक्षकांनी खरे करून दाखवले आहे.
दुर्गम खेडय़ांतील मुलांना शाळेत नियमित यायला लावणे, हेही आव्हान असते. ते पेलण्यासाठी कोणी काय केले, हेही वाचण्यासारखे आहे. कोरकू भाषिक मुले मराठीतून शिकताना बुजतात, त्यामुळे शाळेत ती अबोल वाटतात. त्यांना शीला चोले या शिक्षिकेने (रायपूर, चिखलदरा) प्रयत्नपूर्वक बोलके केले आणि त्यांना शाळा आवडू लागली! सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसलेली बन गावातील जि. प. शाळा ओसाड परिसरात होती. उद्धव बडे या शिक्षकाने ठरवले की शाळा रम्य करायची. मुलांना हाताशी घेऊन त्यांनी रोपे लावली, परिसर हिरवागार केला, तक्ते व पताकांनी शाळा सजवली, टेपरेकॉर्डरवर कविता ऐकण्याचा रिवाज सुरू केला, मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी वर्गावर्गात पाणी, रुमाल, कंगवा, साबण, झाडू, फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवल्या. मुलांना ही प्रसन्न शाळा आपली वाटू लागली, मुले नियमित शाळेत येऊ लागली!
आज बहुतांश शहरी शाळा समाजापासून तुटत आहेत. काही बडय़ा शाळांमध्ये पालकांना पालकसभेव्यतिरिक्त आत येण्यास मुभा नसते, तर आसपासचा समाज शाळेशी जोडला जाणे दुरापास्तच. पण गावोगावच्या जि. प. शाळा मात्र परिसरातील समाजाला शाळेशी घट्ट जोडू पाहात आहेत. याचे दाखले देणारी काही उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात.
हे पुस्तक वाचल्यानंतर ग्रामीण भागातील जि. प. शाळांबद्दल एक आश्वासक भावना निर्माण होते. अर्थात, असे चित्र सर्रास आढळणार नाही. पण ते अतिदुर्मिळही राहिलेले नाही. जेव्हा अशा प्रयोगशील शिक्षकांना यश मिळते, त्यांना समाजाकडून प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्या उपक्रमांचा संसर्ग पसरू शकतो. एकाकी अवस्थेत काम करणाऱ्या या धडपडय़ा शिक्षकांना पुरस्कार वा गौरवाचा मान मिळतोच असे नाही. या पुस्तकामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यांचे काम सर्वासमोर येईल. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. एरवी कॉपी हा प्रकार निषिध्द मानणारे शिक्षणक्षेत्र या उपक्रमांची मात्र आपापल्या उपयुक्ततेपुरती कॉपी करेल, अशी अपेक्षा.
हे पुस्तक साकारण्यात खासदार सुप्रिया सुळे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. कुमुद बंसल आणि डॉ. वसंत काळपांडे यांचे योगदान आहे. मनोगतात त्यांना मांडलेले विचारही महत्त्वाचे आहेत. वेचक-वेधक उपक्रमांचे संकलन करण्याचा हा खटाटोप नियमितपणे व्हायला पाहिजे.
उपक्रम : वेचक-वेधक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई ४०००२१, दूरध्वनी- २२०२८५९८, पृष्ठे- १०४, मूल्य- १०० रुपये. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा